अवघ्या दीड ते दोन तासांत लागेल चिपळूणचा निकाल

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी प्रक्रिया उद्या, रविवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृहात पार पडणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया दीड ते दोन तासांत पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीत १४ प्रभागांमधून २८ नगरसेवकांची निवड होणार असून नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून करण्यात येणार आहे. यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स युनायटेड इंग्लिश स्कूल येथील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून त्यांची मतमोजणी उद्या केली जाणार आहे.

१४ टेबलवर मतमोजणी
मतमोजणीसाठी १४ स्वतंत्र टेबल लावण्यात येणार असून प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल असेल. संबंधित प्रभागाच्या टेबलवर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतांची मोजणीही केली जाणार आहे. ज्या प्रभागांमध्ये दोन मतदान केंद्रे आहेत, तेथे दोन फेऱ्यांत मतमोजणी केली जाईल.

फेऱ्यांनुसार लागणारा वेळ
सात प्रभागांमध्ये चार मतदान केंद्रे असल्याने तेथे चार फेऱ्यांत मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीसाठी सुमारे २० मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

दोन फेऱ्यांच्या ठिकाणी : सुमारे ४० मिनिटे

तीन मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी : ६० ते ७० मिनिटे

चार मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणी : ८० ते ९० मिनिटे

या कालावधीत संबंधित प्रभागांची मतमोजणी पूर्ण होणार आहे.

१०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती
मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, शिपाई व कोतवाल यांचा समावेश आहे. याशिवाय मॅन्युअल टीम, एक्सेल टीम आणि ऑनलाईन टीम कार्यरत असणार आहेत. एकूण १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५० पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. यात एस.आर.पी. व दंगल नियंत्रण पथकाचाही समावेश आहे.

वाहतूक बंद
मतमोजणीच्या कालावधीत कराड रोडवरील चिंचनाका ते बहादूरशेख चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी केले आहे.

राजकीय कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
मतमोजणीच्या काळात विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र ठिकाणांची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाजप–शिवसेना युती : छत्रपती संभाजी चौक, साई मंदिर परिसर

काँग्रेस : अभिषेक हॉटेल गल्ली

शिवसेना (उबाठा) व राष्ट्रवादी शरद पवार गट : मेहता पेट्रोल पंप परिसर

राष्ट्रवादी (अजितदादा गट) : सांस्कृतिक केंद्रासमोर चौपाटीजवळ

अपक्ष व लहान पक्ष : पवन तलाव मैदान

संबंधित लेख