७८४ ग्रॅम गांजासह संशयित जेरबंद
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 33 views
रत्नागिरी, दि. १६ : तालुक्यातील जयगड–नांदिवडे मार्गावरील जेएसडब्ल्यू लेबर कॉलनीच्या कंपाऊंडजवळ गांजासदृश अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका संशयितास जयगड पोलिसांनी अटक केली आहे. सिंदु कुमार राम मिस्त्री (रा. जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, नांदिवडे, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयिताच्या ताब्यातून सुमारे ७८४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत सुमारे २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जयगड–नांदिवडे परिसरात अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती जयगड पोलीस ठाणे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून गस्त वाढविली होती. दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता संबंधित संशयित हा जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी परिसरात संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. तपासणीदरम्यान त्याच्याकडे गांजासदृश अंमली पदार्थ आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले.
याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस ॲक्ट) कलम ८ (क) व २० (ब) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयगड पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील (स.पो.नि.), विलास दिडपसे (पो.उ.नि.), मिलिंद कदम (पोलीस हवालदार), संतोष शिंदे (पोलीस हवालदार) व प्रितेष लोटणकर (पोलीस शिपाई) यांच्या पथकाने केली.
