४८ वर्षांनंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात — फक्त नावावरून मिळाला शोध!

मुंबई (प्रतिनिधी): तब्बल ४८ वर्षांपूर्वी महिलेवर चाकू हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढले आहे. १९७७ साली मुंबईत घडलेल्या या गुन्ह्याचा आरोपी चंद्रशेखर मधुकर कालेकर अखेर पोलिसांच्या हाती लागला. विशेष म्हणजे, पोलिसांच्या हाती आरोपीचा केवळ नावाचा धागा असतानाही त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रशेखर कालेकर हा मूळचा मुंबईतील लालबाग परिसरात वास्तव्यास होता. १९७७ साली किरकोळ वादातून त्याने एका महिलेवर चाकूने सपासप वार करून जखमी केले होते. या घटनेनंतर त्याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला अटकही झाली. मात्र कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर तो पोलिस आणि न्यायालयाच्या हातावर तुरी देत फरार झाला.

पोलिसांना चकवा देण्यासाठी कालेकरने सांताक्रुज, गोरेगाव, माहीम, लालबाग आणि बदलापूर अशा विविध ठिकाणी वास्तव्य बदलत राहिला. अखेरीस तो कोकणातील दापोलीजवळील एका गावी स्थायिक झाला. दरम्यान, कोर्टात तो हजर राहत नसल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले, आणि कालांतराने संबंधित चाळ कोसळल्याने त्याचा पत्ता मिळणे अशक्य झाले.

काही महिन्यांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी हा जुना तपास पुन्हा सुरू केला. मात्र आरोपीचा केवळ नावाचा पुरावा त्यांच्या हाती होता. तरीही पोलिसांनी हार न मानता निवडणूक आयोग आणि आरटीओच्या ऑनलाइन पोर्टल्सचा आधार घेतला.

या तपासात ‘चंद्रशेखर मधुकर कालेकर’ नावाचा एकच मतदार संपूर्ण महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळाली. पुढील पडताळणीत तो रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे रहात असल्याचे स्पष्ट झाले. दापोली पोलीस ठाण्यात चौकशी केली असता या नावाच्या व्यक्तीवर २०१५ साली एका अपघाताचा गुन्हा नोंद असल्याचे उघड झाले. आरटीओकडून मिळालेल्या लायसन्सवरील फोटो व तपशीलांवरून त्याची खात्री पटली.

त्यानंतर पोलिसांचा चमू थेट आरोपीच्या घरी पोहोचला. अचानक पोलिसांना पाहून कालेकर अवाक् झाला. एवढ्या वर्षांनी पोलीस स्वतःला पकडण्यासाठी येतील, याची त्याला कल्पनाही नव्हती. ४८ वर्षांपूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी केलेला गुन्हाही त्याच्या लक्षात येईना. मात्र पोलिसांनी सर्व पुरावे आणि माहिती त्याच्यासमोर मांडल्यावर त्याने गुन्हा कबूल केला.

सदर आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
या घटनेनंतर पोलीस विभागाने जुन्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू केल्यास ‘न्यायाला वेळ लागतो, पण तो मिळतोच’ हे दाखवून दिले आहे.

संबंधित लेख