विनोद बंडगर यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
- by Yogesh Bandagale
- January 01, 2026
- 79 views
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृतीत प्रथम क्रमांक
लांजा (जि. रत्नागिरी) : श्रीराम विद्यालय, वेरवली बु. (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील उपक्रमशील शिक्षक श्री. विनोद यशवंत बंडगर यांची ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिक्षक प्रतिकृती (माध्यमिक गट) या विभागात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
श्री. बंडगर यांनी सादर केलेल्या गणितीय शैक्षणिक प्रतिकृतीतून शैक्षणिक नाविन्य, प्रयोगशीलता तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला होता. त्यांच्या या अभिनव आणि अभ्यासपूर्ण सादरीकरणाची दखल घेत परीक्षकांनी त्यांना प्रथम क्रमांकाने गौरवले असून राज्यस्तरावर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मारुती डोळस, सचिव श्री. संतोष पडवणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमोल रेडीज, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री. अरुण डोळे, शिक्षकवर्ग, पालकवर्ग, ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांनी श्री. बंडगर यांचे अभिनंदन केले आहे.
श्री. विनोद बंडगर यांच्या या यशामुळे श्रीराम विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा नावलौकिक वाढला असून, त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
