लोकांनी आग्रह केला तर निवडणूक लढविण्याचा विचार
- by Yogesh Bandagale
- October 02, 2025
- 132 views
चिपळूण: “सामाजिक व राजकीय जीवनातून निवृत्त कधी व्हायचं हे आपण ठरवत नाही, ते जनतेने व कार्यकर्त्यांनी ठरवायचं असतं. जर लोकांनी आग्रह केला तर मी पुन्हा निवडणूक लढवीन,” असा सूचक इशारा माजी आमदार रमेशभाई कदम यांनी दिला. त्यांच्या या विधानाने उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.
चिपळूण नगर परिषद व पूज्य गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारेश्वर येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील स्वच्छता, आरोग्य व प्लास्टिकमुक्त मोहिमेबाबत त्यांनी चिपळूण नगर परिषदेच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, “सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे आज चिपळूण शहर निरोगी व स्वच्छ आहे. नगर परिषद नियमितपणे घरोघरी जाऊन कचरा संकलन करत आहे, हे विशेष आहे. मात्र काही नागरिक अजूनही रस्त्याच्या कडेला कचरा टाकतात. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयद्रथ खताते, चिपळूण अर्बन बँकेचे माजी संचालक सतीशअप्पा खेडेकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक होमकळस, सामाजिक कार्यकर्ते सुरेश राऊत, आरोग्य विभागाचे सुजित जाधव, पाणीपुरवठा विभागाचे रोहित खाडे, निवेदक शिक्षक प्रकाश गांधी, सुनील खेडेकर, विवेक रेळेकर, जाफर गोठे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी परीक्षक हसन मुसा, गिरीराज पांडे, विनायक बांद्रे आणि शरयू इंदुलकर यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सई वरवटकर आणि सुनील खेडेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध गटांतील निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सहभागी शाळांना पुस्तक भेट देण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते कापरे हायस्कूलच्या चौथीतील विद्यार्थिनी अदिती भुरके हिचे प्रभावी भाषण. तिच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सांगता लियाकत शहा यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
