लांजाच्या सुकन्या वर्षा चव्हाण यांचा ‘कोकणरत्न’ पुरस्काराने सन्मान

मुंबई (सुरेश सप्रे) : अभियानतर्फे दिला जाणारा मानाचा ‘कोकणरत्न’ पुरस्कार मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवनात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वर्षा चव्हाण या बदलापूर शहरातील सामाजिक व राजकीय वर्तुळात एक तडफदार युवा नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने भरीव कार्य केले असून सामाजिक बांधिलकी हीच त्यांच्या कार्याची ओळख ठरली आहे.

सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी लांजा–रत्नागिरी येथून केली. स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा तसेच विविध आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कार्यामुळे जनसंपर्क वाढत गेला आणि याच काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

सन २०२२ मध्ये त्यांनी शिवसेना महिला आघाडी उपशाखा प्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. कार्यपद्धती, संवादकौशल्य आणि महिलांसाठी सातत्याने केलेली धडपड यामुळे त्यांना अल्पावधीतच मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. २०२३ मध्ये त्यांची शिवसेना उपशहर संघटिका म्हणून निवड झाली, तर २०२५ मध्ये उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या बदलापूर पूर्व विभागाच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

पक्ष संघटनेत तळागाळात जाऊन केलेल्या कामामुळे त्यांनी प्रभावी व तडफदार नेतृत्व म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राजकारणासोबतच त्यांचा सामाजिक व मानवाधिकार क्षेत्रातील सहभागही उल्लेखनीय आहे. त्या कोकण युवा सेवा संस्थाच्या सदस्य असून आंतरराष्ट्रीय मानवाधिकार (ह्यूमन राईट्स) संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये जनादेश टीव्ही न्यूज व निर्भय पत्रकार संघटनेचा ‘जननायिका’ पुरस्कार, वैभव फाउंडेशन गोवातर्फे ‘भारत निर्माण योगदान पुरस्कार’, तसेच पूर्णत्व फाउंडेशनचा ‘सन्मानमूर्ती’ पुरस्कार यांचा समावेश आहे.

कोकणातील लांजा तालुक्यातील सुकन्या असलेल्या वर्षा चव्हाण आज बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर ठरत आहेत. युवा नेतृत्व म्हणून त्या नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, पुढील काळात मुंबई व कोकणातील महिलांसाठी नव्या संधी, उपक्रम आणि सशक्तीकरणाच्या दिशेने व्यापक कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित लेख