राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत विश्वविक्रमी कलाकार विलास रहाटे प्रथम
- by Yogesh Bandagale
- December 27, 2025
- 181 views
देवरूख | प्रतिनिधी : वेरवली, ता. लांजा (जि. रत्नागिरी) येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावून मोठे यश संपादन केले.
देवरूख येथील श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय तसेच का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूल, वेरवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी आयोजकांनी ‘पोट्रेट (व्यक्तिचित्र)’ हा विषय दिला होता. भारतीय खेळाडू, चित्रपट व नाट्य कलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी तसेच देवी-देवता यांपैकी कोणत्याही एका व्यक्तिमत्त्वावर आधारित रांगोळी साकारण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
या आव्हानाला समर्थपणे सामोरे जात विलास रहाटे यांनी जागतिक कीर्तीचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनावर आधारित ३ x ४ फुट आकाराची भव्य व आकर्षक रांगोळी साकारली. ही कलाकृती त्यांनी अवघ्या १२ तासांत पूर्ण केली.
या रांगोळीत त्यांनी ‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, जो स्व. राम सुतार यांनी साकारलेला जगप्रसिद्ध पुतळा आहे, त्याची हुबेहूब प्रतिकृती तसेच स्व. राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन प्रभावी छबी अत्यंत कलात्मक पद्धतीने रेखाटल्या होत्या.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. विलास रहाटे यांना रोख रक्कम रु. ११,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
रांगोळी कलेतील सातत्यपूर्ण यशामुळे विलास रहाटे यांच्यावर रत्नागिरी जिल्हाभरातून कौतुकांचा वर्षाव होत असून त्यांच्या या यशामुळे देवरूख परिसराचा नावलौकिक वाढला आहे.
