रत्नागिरीच्या वैद्य निकिता कोळी यांना “आयुर्वेद महिला नेतृत्व आयकॉन पुरस्कार

रत्नागिरी : रत्नागिरी येथील आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य निकिता जे. कोळी यांना विश्वगुरु संवाद संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात “आयुर्वेद महिला नेतृत्व आयकॉन पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आला. हा सन्मान १० व ११ जानेवारी २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र येथे पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आयुर्वेद क्षेत्रातील नेतृत्व, शिक्षण, चिकित्सक सेवा आणि जागतिक पातळीवरील योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार अग्निकर्म तज्ज्ञ वैद्य चंद्रकुमार देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वैद्य निकिता कोळी या कन्सल्टंट आयुर्वेदिक फिजिशियन व गर्भसंस्कार तज्ज्ञ असून, आयुर्वेद केवळ उपचारपद्धती न राहता जीवनशैली म्हणून समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत. प्री-कन्सेप्शन केअर, गर्भसंस्कार, गर्भिणी व सूतिका परिचर्या, बाळ संस्कार, आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी, होलिस्टिक हेल्थ व वेलनेस या क्षेत्रांत त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

त्यांनी के.एल.ई. विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक) येथून बॅचलर ऑफ आयुर्वेद मेडिसिन अँड सर्जरी (BAMS) पदवी प्राप्त केली असून, सध्या अळवास आयुर्वेदिक मेडिकल विद्यापीठ, मंगळूर (कर्नाटक) येथे एम.डी. (स्वस्थवृत्त व योग) पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. पदवी शिक्षणादरम्यान शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी त्यांना हिमालया वेलनेसतर्फे “आयुर्वेद विशारदा पुरस्कार” मिळाला होता.

वैद्यकीय सेवेसोबतच त्या अध्यापन व मार्गदर्शन क्षेत्रातही सक्रिय असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयुर्वेद व वेलनेस अकॅडमींसोबत त्यांनी सहकार्य केले आहे. ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे त्या देश-विदेशातील रुग्णांना सेवा देत असून, त्यांच्या उपचारांना समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. आयुर्वेद विद्यार्थी व नवोदित चिकित्सकांसाठी त्या संरचित मेंटॉरशिप कार्यक्रम राबवत असून, BAMS अभ्यास मार्गदर्शन, एम.डी. पदव्युत्तर शिक्षण नियोजन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व कंटेंट क्रिएशन या विषयांवर त्या सुलभ मार्गदर्शन करतात.

“आयुर्वेद ही केवळ चिकित्सा पद्धती नसून जाणीवपूर्वक जगण्याची कला आहे,” असा त्यांचा ठाम विश्वास असून, आयुर्वेदाच्या शाश्वत ज्ञानातून आरोग्यदायी जीवनप्रवास घडवणे हेच त्यांचे ध्येय आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत विश्वगुरु संवाद संस्थेतर्फे हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

संबंधित लेख