रंगभूमीवर कौटुंबिक गोडवा; चिपळूणमध्ये बुधवारी ‘कुटुंब किर्रतन’ नाटकाचा प्रयोग
- by Yogesh Bandagale
- November 17, 2025
- 85 views
चिपळूण : मराठी रंगभूमीवर विविधतेने नटलेली, कुटुंब हा केंद्रबिंदू असलेली नाटकं प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. अशाच धाटणीचे नवंकोरं आणि चर्चेत असलेलं ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक आता चिपळूणमध्ये रंगमंचावर सादर होत आहे. बुधवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे या नाटकाचा विशेष प्रयोग होणार आहे.
प्रशांत दामले फॅन फाऊंडेशननिर्मित आणि गौरी थिएटर्स प्रस्तुत या नाटकात वंदना गुप्ते, संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले आणि अमोल कुलकर्णी ही कलाकारांची प्रभावी फळी रसिकांसमोर उभी राहणार आहे. संकर्षण कऱ्हाडे यांनी लेखन केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन अमेय दक्षिणदास यांनी केले आहे.
नाटकाविषयी बोलताना लेखक-अभिनेता संकर्षण कऱ्हाडे म्हणाले, “हे माझं आणि निर्माते प्रशांत दामले यांचं एकत्रित चौथं नाटक. या नाटकात अनेक गोष्टी पहिल्यांदाच अनुभवायला मिळत आहेत. अमेय दक्षिणदास यांचं हे पहिलंच व्यावसायिक नाटक असून तन्वी मुंडले हिचीदेखील व्यावसायिक रंगभूमीवरील ही पहिली पायरी आहे. वंदना गुप्तेसोबत काम करण्याची पहिलीच संधी मिळत आहे. अमोल कुलकर्णी आमच्या मागील नाटकातील सहकलाकार असल्याने आमची केमिस्ट्री छान जुळली आहे.”
‘कुटुंब किर्रतन’ हे सासू–सून–नवरा यांच्या विनोदी साखळीतून उभं राहिलेलं, हसवणूक आणि कौटुंबिक भावना यांचा सुरेख मेळ साधणारं नाटक असल्याचे दिग्दर्शक अमेय दक्षिणदास यांनी सांगितले. “प्रायोगिक रंगभूमीवर २० वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. पहिल्याच नाटकासाठी दामलेसारखे ज्येष्ठ निर्माता आणि वंदनाताईंसारखी ज्येष्ठ अभिनेत्री मिळणे हा मोठा सन्मान आहे,” असे त्यांनी सांगितले.
या नाटकातील भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या, “गेली पाच वर्षे एका नाटकात काम करत होते, पण नवीन नाटकाकडे ओढ होतीच. संकर्षणने उत्तम लेखन केले असून माझी भूमिका देखील आकर्षक आहे. दामले निर्मिती असल्यामुळे मी लगेच होकार दिला. बराच काळानंतर पुन्हा विनोदी भूमिकेत दिसणार असून प्रेक्षकांना हसवण्याचं आव्हान उत्साहाने स्वीकारलं आहे.” चिपळूणमधील रसिकांसाठी एक आनंदाची संधी, कौटुंबिक नात्यांच्या गुंफणीचे आणि हशा–टाळ्यांचे रंगलेले ‘कुटुंब किर्रतन’ रंगमंचावर सादर होण्यासाठी सज्ज आहे.
