युनायटेड गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर गुजरातमध्ये

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुकुल विभागामध्ये राबविण्यात येणारा मातृभूमी परिचय शिबिर हा एक महत्त्वाचा उपक्रम असून या वर्षी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुजरात राज्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्वाच्या स्थळांना भेट दिली. दिनांक ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत हे शिबिर संपन्न झाले.

गुजरात हे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे, कापड उद्योगाचे केंद्र तसेच धवल क्रांतीचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे राज्य. शिबिरादरम्यान अहमदाबाद येथील वैष्णोदेवी मंदिर, अक्षरधाम मंदिरातील साउंड-लाईट शो, पाटण येथील युनेस्को मानांकन प्राप्त राणी की बाव या स्थापत्यवैभवाचे दर्शन व अध्ययन करण्यात आले. तसेच साबरमती नदीवरील अटल वॉकिंग ब्रीज व निसर्ग उद्यानाचा अनुभवही विद्यार्थ्यांनी घेतला.

महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातील निवासस्थान, चरखा, प्रार्थना स्थळ आणि तिथल्या ऐतिहासिक घटना जाणून घेत विद्यार्थ्यांनी गांधी तत्त्वज्ञान, साधेपणा आणि आत्मानुशासन यांची मूल्ये आत्मसात केली. त्याचबरोबर देशाच्या एकीकरणात मोलाची भूमिका बजावणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ला भेट देत त्यांच्या कार्याचा विशाल पल्ला समजून घेतला.

अहमदाबाद येथील विंटेज कार म्युझियम मधील २०० हून अधिक दुर्मीळ देशी-विदेशी वाहनांचा इतिहास विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांच्या अमूल च्या दुग्धउत्पादन व चॉकलेट उत्पादन प्रकल्पास भेट देऊन दूध प्रक्रिया व पॅकेजिंगची आधुनिक तंत्रज्ञानाधारित पद्धत प्रत्यक्ष पाहण्यात आली. तसेच गुजरात सायन्स सेंटरमधील रोबोटिक आणि ॲक्वेटिक विभागातील तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती मिळाली.

नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या गरुडेश्वर येथील दत्त मंदिर आणि टेंबे स्वामींच्या समाधीस्थळास भेट देऊन विद्यार्थ्यांनी भजन सेवा अर्पण केली.

या शिबिरातून विद्यार्थ्यांना भारतीय वारसा, इतिहास, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, विज्ञान-तंत्रज्ञान, उद्योग, शेती-व्यवस्था यांचा अनुभवात्मक परिचय झाला. तसेच गुजराती खाद्यसंस्कृती, बोलीभाषा आणि समाजजीवन जाणून घेताना राष्ट्रीय ऐक्याची जाणीव दृढ झाल्याचे गुरुकुल विभागातर्फे सांगण्यात आले.

संबंधित लेख