माजी नगरसेवक शिरीष काटकर यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले पत्र
- by Yogesh Bandagale
- October 30, 2025
- 112 views
चिपळूण : फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याचा तीव्र निषेध करत माजी नगरसेवक शिरीष काटकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खुले पत्र लिहिले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “दादा आपण डाव्या विचारसरणीचे, निर्णयक्षम आणि स्पष्टवक्ते नेता आहात. सत्याला न्याय देण्याची आपली वृत्ती महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र, आपण ज्यांना महत्त्वाच्या पदांवर बसवता, त्यांच्या चुकीकडे दुर्लक्ष केले जाते, हे दुर्दैवी आहे.”
डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचा उल्लेख करत काटकर यांनी म्हटले आहे की, “ग्रामीण भागातून स्वकर्तृत्वाने ध्येय गाठणारी आणि आई-वडिलांचा आधार बनलेली एक तरुणी, सडलेल्या यंत्रणेच्या फेऱ्यात सापडून आपले आयुष्य संपवते — ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. अशा प्रसंगी संवैधानिक पदावरील व्यक्तीने असंवेदनशील वक्तव्य करणे हे केवळ दुर्दैवीच नाही, तर पदाच्या मर्यादांचा भंग आहे.”
काटकर यांनी अजित पवार यांना विनंती केली आहे की, “पदाची प्रतिष्ठा न राखणाऱ्या अशा व्यक्तीची तत्काळ पदावरून हकालपट्टी करून आपल्या कार्यशैलीची ओळख महाराष्ट्राला दाखवावी.”
पत्राच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे की, “ही घटना फक्त एका युवतीच्या मृत्यूची नाही, तर महाराष्ट्रातील असंख्य संपदांच्या आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
