महानगर गॅसच्या ठेकेदारांची मनमानी
- by Yogesh Bandagale
- December 28, 2025
- 133 views
लोटे : लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात महानगर गॅस कंपनीच्या ठेकेदारांकडून नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने रस्त्यात खोदकाम करण्याचा प्रकार समोर आला आहे. आवाशी फाटा येथील एम. को. पेस्टिसाइड ते एस. आर. फाट्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर परवानगीशिवाय खोदकाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राज आंब्रे यांनी संबंधित काम त्वरित थांबवण्याचे आदेश दिले.
या प्रकरणी ॲड. आंब्रे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने प्राचारण करून काम थांबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, “एमआयडीसीमधील रस्त्यांची अवस्था आधीच अत्यंत दयनीय आहे. गेल्या सहा महिन्यांपासून महानगर गॅस कंपनीने रस्ते घासून व खोदून माती रस्त्यावरच टाकलेली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही योग्य कार्यवाही झालेली नाही.”
ठेकेदारांकडून रस्ते पूर्ववत दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप ॲड. आंब्रे यांनी केला. “यापुढे अशा पद्धतीने काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. माती टाकून बुजवलेले सर्व रस्ते त्वरित आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने दुरुस्त करावेत,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक, उद्योगधंदे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून एमआयडीसी प्रशासनाने ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी उद्योग संघटनांकडून होत आहे.
