भारतरत्नांचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा ; पालकमंत्री डॉ. उदय सामंत
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 92 views
रत्नागिरी, दि. १६ (जिमाका): “भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या कार्याचा आदर्श घ्या. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तुम्हीही आयुष्यात एवढे मोठे व्हा की एक दिवस तुमचंही शिल्प उभारलं जाईल,” अशा शब्दांत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना आणि महिलांना प्रेरित केलं.
स्वयंवर मंगल कार्यालयात भारतरत्न सन्मानितांच्या शिल्प लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजेंद्र महाडीक, बिपीन बंदरकर, स्मिता पावसकर, सुदेश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सामंत म्हणाले, “या शिल्पांमागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि कल्पकता दडलेली आहे. सुमारे २५ टन वेस्ट मटेरियलपासून ही सहा शिल्पे तयार करण्यात आली आहेत — आणि देशात पहिल्यांदाच असा उपक्रम आपल्या रत्नागिरीत झाला आहे. नऊ-नऊ महिने विद्यार्थ्यांनी घाम गाळून तयार केलेली ही शिल्पं म्हणजे त्यांचं आत्मस्वरूप आहे.”
ते पुढे म्हणाले, “महर्षी कर्वे, पांडुरंग काणे, विनोबा भावे, डॉ. आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर — या सर्व महान व्यक्तींनी त्यांच्या क्षेत्रात समाजासाठी मोठं योगदान दिलं. त्यांचं कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रत्नागिरीत वकिली करत अनेक खटले हाताळले. अशा व्यक्तीने देशाला लोकशाही आणि घटना दिली. हा आपल्या जिल्ह्याचा अभिमान आहे.”
रत्नागिरीचा विकास आणि शिक्षणक्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख करत पालकमंत्री म्हणाले, “आज रत्नागिरी छोटं शहर राहिलेलं नाही. पुण्यापेक्षा उत्तम शैक्षणिक सुविधा इथे उपलब्ध होत आहेत. रत्नागिरी मेडिकल कॉलेजमध्ये पुढील वर्षापासून एम.डी. आणि एम.एस. अभ्यासक्रम सुरू होत आहे. शिकलेली, नव्या कल्पनांनी सज्ज पिढी जेव्हा राजकारणात येईल, तेव्हाच राजकारण आधुनिक होईल.”
कार्यक्रमात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे शिक्षक शशिकांत काकडे, विजय बोंदर आणि विद्यार्थी विजय पाटील यांचा डॉ. सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली.
प्रास्ताविक मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी केलं.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
