परशुराम डोंगर परिसरात भीषण वणवा; वनसंपदा जळून खाक
- by Yogesh Bandagale
- January 14, 2026
- 99 views
चिपळूण : ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या चिपळूण तालुक्यातील परशुराम डोंगर परिसरात बुधवारी सायंकाळी भीषण वणव्याने थैमान घातले. या आगीत डोंगराचा मोठा भाग आगीच्या कवेत सापडल्याने संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले, तर आगीच्या ज्वाळा व धूर दूरवरून स्पष्टपणे दिसून येत होते. या वणव्यामुळे परिसरातील मौल्यवान वनसंपदा जळून खाक झाली असून जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच लागलेल्या या आगीत शेकडो लहान-मोठी झाडे, झाडी-झुडपे व गवत पूर्णपणे जळून गेले. त्यामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम झाला असून, अनेक सरपटणारे प्राणी व पक्षी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
परशुराम डोंगर परिसरात दरवर्षी वणव्याच्या घटना घडत असल्याचे चित्र आहे. मागील काही वेळा वन विभागाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले होते; मात्र बुधवारी लागलेला वणवा अत्यंत तीव्र व रौद्र स्वरूपाचा असल्याने त्यावर तातडीने नियंत्रण मिळवणे कठीण ठरले.
या वारंवार घडणाऱ्या वणव्यांमुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होत असल्याने निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर वणवा नैसर्गिक कारणांमुळे लागला की मानवनिर्मित आहे, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
डोंगरावरील ही आग वेळीच रोखण्यासाठी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाने केवळ कागदोपत्री उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जमिनीवर ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
