नामदेव समाजोन्नती परिषदेची रत्नागिरी जिल्हा बैठक संपन्न
- by Yogesh Bandagale
- January 13, 2026
- 51 views
देवरूख (प्रतिनिधी) : नामदेव समाजोन्नती परिषदेच्या रत्नागिरी जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक दि. ११ जानेवारी रोजी देवरूख येथील प्रसन्न ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात उत्साहात संपन्न झाली. ही सभा परिषदेचे राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या प्रारंभी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या सभेस राज्याध्यक्ष संजय नेवासकर, मुख्य विश्वस्त राजेंद्र पोरे, सचिव प्रविण शिंत्रे, विक्रांत डोंगरे, कोकण विभागीय उपाध्यक्ष अनंतराव टमके, संगमेश्वर तालुका अध्यक्ष अशोक कुमटेकर यांच्यासह विविध पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेमध्ये रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली तसेच सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांचीही नेमणूक करण्यात आली. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष दत्तात्रय भस्मे यांनी जिल्ह्यातील समाजबांधवांच्या सध्याच्या कार्याचा आढावा घेत, “आपण समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव ठेवून सर्वांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत,” असे आवाहन केले.
या बैठकीत नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकांमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या सौ. साक्षी किशोर मानकर (लांजा), सौ. वर्षा परशुराम ढेकणे (रत्नागिरी), अंकुश अशोक आवले (चिपळूण) आणि सिद्धेश वेल्हाळ (देवरूख) यांचा जिल्हा कार्यकारिणी व संगमेश्वर तालुका शिंपी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजबांधवांनी आपली मनोगते व्यक्त करत समाजाला उज्ज्वल भविष्य कसे घडवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष संजय नेवासकर यांनी पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या नामदेव महाराजांच्या मंदिराबाबत सविस्तर माहिती देत, राज्य व देशपातळीवर नामदेव शिंपी समाजाकडून होत असलेल्या कार्याचा आढावा मांडला. सर्वांनी एकसंध राहून संघटितपणे पुढील वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेचे सूत्रसंचालन सौ. श्वेता दत्तात्रय भस्मे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. तृप्ती अशोक कुमटेकर यांनी मानले.
