उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी, दीड तासात निकालाचे चित्र स्पष्ट
- by Yogesh Bandagale
- December 20, 2025
- 205 views
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्या रविवार दिनांक २१ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून सकाळी ठीक १० वाजता युनायटेड इंग्लिश स्कूल येथील गुरुदक्षिणा सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे.
मतमोजणी कक्षामध्ये पत्रकारांना प्रवेश देण्यात येणार असून प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र उभे राहण्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक फेरीनंतर अधिकृत आकडेवारी जाहीर केली जाणार आहे.
या मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल्स लावण्यात येणार असून नगर परिषदेच्या १४ प्रभागांतील प्रत्येकी एक केंद्रातील ईव्हीएम मशिन्स मतमोजणीसाठी वापरण्यात येणार आहेत. काही प्रभागांचे निकाल तीन फेऱ्यांनंतर जाहीर होतील, तर काही प्रभागांसाठी चार फेऱ्या लागण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी एकूण चार फेऱ्या होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या मतमोजणीनंतर साधारणतः एक ते दीड तासात, म्हणजेच साडेअकरा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्सुकतेचे वातावरण असून प्रशासनाने सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या अनेक महत्त्वाच्या लढतींकडे लक्ष वेधले गेले आहे. माजी नगरसेवक शशिकांत मोदी, आशिष खातू, मोहन मिरगल, अविनाश केळसकर, कबीर कादरी यांच्यासह अन्य अनुभवी व नवोदित उमेदवारांच्या लढती राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
मात्र, या सर्वांवर कडी करत नगराध्यक्ष पदाच्या लढतीकडेच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विद्यमान नगराध्यक्ष रमेश कदम आणि माजी नगरसेवक उमेश सकपाळ यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची लढत झाली आहे.
या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या प्रभावी प्रचारामुळे व त्यांच्या समर्थकांमध्ये असलेल्या उत्साहामुळे ही लढत केवळ चिपळूणपुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून मतमोजणीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
