डेरवण शाळेची राधा पाटणकर चतुरंग गोडबोले पुरस्काराने सन्मानित

चिपळूण, ता. ११ : कोकणातील शाळांमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार यावर्षी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, डेरवणची विद्यार्थिनी राधा  पाटणकर (इ.१० वी) हिला प्रदान करण्यात आला. यंदाचे हे या पुरस्काराचे रौप्य महोत्सवी वर्ष असून २४३ विद्यार्थ्यांमधून ३६ विद्यार्थ्यांची ग्रूप इंटरव्ह्यूद्वारे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.


रविवारी चिपळूणमधील इंदिरा सांस्कृतिक केंद्रात साकारलेल्या सोहळ्यात राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे आणि मेजर जनरल (नि.) श्री. शिशिर महाजन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रु. १००० आणि ५०० रुपयांची पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
 

राधा ही नर्सरी पासून डेरवण शाळेची विद्यार्थिनी असून अभ्यासासोबतच वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन, वादविवाद, कथ्थक, रामरक्षा पाठांतर अशा अनेक स्पर्धांमध्ये शालेय स्तरावर यश संपादन केले आहे. 

राधाने तिच्या यशाचे श्रेय तिचे पालक, शिक्षक यांना दिले आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे विश्वस्त श्री. विकास वालावलकर, शाळेच्या संचालिका सौ. शरयू यशवंतराव, मुख्याध्यापिका प्रज्ञा पारकर, जान्हवी चाळके आणि कल्पेश जुवेकर यांनी अभिनंदन केले आहे.
 

संबंधित लेख