जिल्हास्तरीय सरस प्रदर्शनाचे गणपतीपुळ्यात उद्घाटन
- by Yogesh Bandagale
- December 24, 2025
- 55 views
पारंपरिक उत्पादनाला नाविन्याची जोड; महिला बचतगटांचे सक्षमीकरण
रत्नागिरी, दि. २४/१२/२०२५ – जिल्ह्यातील महिला बचतगटांनी पारंपरिक उत्पादनाला नाविन्याची जोड दिली असून, कोकणच्या मेव्याला वैविध्यता आणत विविध पदार्थ बनविले आहेत. तसेच गारमेंट क्लस्टर व पॅकेजिंग क्लस्टर सुरु होत आहेत. महिला बचतगटांना सक्षमीकरण करण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन २८ डिसेंबरपर्यंत श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे चालणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री विजयसिंह जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री अजिंक्य आजगेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती भारती बिराजे, सरपंच कल्पना पकये, श्री क्षेत्र देवस्थानचे सरपंच श्री निलेश कोल्हटकर, गटविकास अधिकारी श्री चेतन शेळके, मंडणगड गटविकास अधिकारी श्री सुनिल खरात आदी उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मार्गदर्शन करताना श्रीमती रानडे यांनी सांगितले, “पारंपरिक उत्पादनाबरोबरच महिला बचतगटांनी त्यात नाविन्याची भर घातली आहे. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धांमध्ये हिरकणी सारख्या बचतगटांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला राष्ट्रीय स्तरावर आपले उत्पादन सादर करीत आहेत. सर्वांनी येऊन २८ तारखेपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यावा, खाद्यपदार्थांची रुचकर मेजवानी घ्यावी आणि महिलांचा उत्साह वाढविण्यास मदत करावी.”
प्रकल्प संचालक श्री विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविक करून उमेद बचतगटांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. आभार प्रदर्शन साक्षी वायंगणकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमिका नागवेकर यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी सर्व स्टॉलची पाहणी करून महिलांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.
