जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा; रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील सायकलपटूंचा वरचष्मा

रत्नागिरी : जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज डेरवण येथील SVJCT क्रीडा संकुलात उत्साहात पार पडल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

१४ वर्षाखालील टाईम ट्रायल प्रकारात रत्नागिरीचा रुद्र जाधव पहिला, तर चिपळूणचा मिथिल टाकळे दुसरा ठरला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात दापोलीचा वरद कदम प्रथम, तर चिपळूणचा ईशान वझे द्वितीय आला. मुलींच्या गटात रत्नागिरीची शमिका खानविलकर हिने विजेतेपद पटकावले. मास स्टार्ट प्रकारात खेडच्या पियुष पवार व दिशांत पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

खेळाडूंना विविध क्लबचे योग्य मार्गदर्शन लाभले. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, खेड सायकलिंग क्लब, दापोली सायकलिंग क्लब आणि चिपळूण सायकलिंग क्लबच्या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील सायकलिंगला मोठी चालना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबमार्फत जिल्ह्यातील उदयोन्मुख सायकलपटूंना रेसर सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. याच सायकलवर रुद्र जाधव याने विजेतेपद मिळवून या उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केली.

सायकलिंग क्षेत्रातील या यशाबद्दल जिल्ह्यातील सायकलप्रेमींनी सर्व शालेय सायकलपटूंचे अभिनंदन केले.
 

संबंधित लेख