जिप व पं.स. आरक्षणाचा अनेकांना फटका
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 71 views
महायुती व महाआघाडीत जागा वाटपातील तिढा सोडवताना नेत्यांचा कस पणाला
देवरूख (सुरेश सप्रे): आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
या नव्या आरक्षणामुळे अनेक विद्यमान सदस्यांच्या गटांमध्ये बदल झाल्याने महायुती व महाआघाडी दोन्ही पातळ्यांवर जागा वाटपात ताणतणाव निर्माण होणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. पक्षांतर्गत गटबाजी, शह-काटशहाचे राजकारण आणि संभाव्य पक्षांतराची शक्यता यामुळे आगामी निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची दाट शक्यता आहे.
मागील निवडणुकीत विजयी झालेले सहदेव बेटकर, शंकर कांगणे, संतोष थेराडे, सौ. रजनी चिंगळे, माधवी गिते यांचे गट आरक्षित झाल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुनर्वसन न झाल्यास त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे.
तर रोहन बने, सौ. रचना महाडीक, मुग्धा जागुष्टे, वेदा फडके, नेहा माने यांना पुन्हा जिल्हा परिषदेत संधी मिळू शकते.
पंचायत समिती गणात माजी सभापती सुजीत महाडीक आणि छोट्या गवाणकर यांच्या गणांचे आरक्षण झाल्याने त्यांना या निवडणुकीतून दूर रहावे लागू शकते.
दरम्यान, महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. “आरक्षणानंतर उमेदवार जाहीर करून लगेच कामाला लागा” अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी प्रत्येक गणातील मेळाव्यांत दिल्याने महायुतीतील जागा वाटपातील तिढा वाढण्याची शक्यता आहे.
