जिथे रडू उसळणार होते, तिथे ‘हॅपी बर्थडे’चा गजर
- by Yogesh Bandagale
- January 15, 2026
- 207 views
रामटेक : शहरातील आंबेडकर वॉर्डात एक थरारक आणि भावनिक घटना घडली. १०३ वर्षांच्या गंगाबाई सावजी साखरे यांना मृत समजून कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारी केली असतानाच, तिरडीवर ठेवलेल्या अवस्थेत त्यांच्या पायाच्या बोटांची हालचाल दिसून आली. क्षणात वातावरण बदलले आणि मृत्यूच्या दारातून परतलेल्या गंगाबाईंनी जणू पुनर्जन्मच घेतला. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी, १३ जानेवारी रोजी, त्यांचा वाढदिवस असल्याने जिथे शोककळा पसरायची होती, तिथे ‘हॅपी बर्थडे’चा गजर घुमला.
गंगाबाई साखरे या मूळच्या चारगाव (ता. रामटेक) येथील असून त्या रामटेक शहरातील आंबेडकर वॉर्डात आपल्या मुलगी कुसुमा अंबादे यांच्या घरी वास्तव्यास होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी असून पूर्णतः बेडरेस्टवर होत्या. त्या बोलू शकत नव्हत्या आणि दिवसातून केवळ पाणी घेत होत्या. शतक पार केलेल्या गंगाबाईंची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने कुटुंबीय सतत चिंतेत होते.
१२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसून आली नाही. श्वासोच्छ्वासही थांबल्यासारखा वाटल्याने कुटुंबीयांनी त्यांना मृत समजले. त्यानंतर नातेवाईकांना फोनवरून निधनाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियावरही वार्ता पसरली. घरासमोर मंडप उभारण्यात आला, अंत्ययात्रेची वेळ निश्चित करण्यात आली आणि अंत्यविधीची तयारी सुरू झाली.
सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास नातू राकेश साखरे यांचे आजीच्या पायांकडे लक्ष गेले. त्यावेळी अचानक त्यांच्या पायाच्या बोटांची हालचाल झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला विश्वास न बसल्याने त्यांनी बारकाईने निरीक्षण केले. त्वरित बोटांची बांधणी सोडण्यात आली. तेवढ्यात गंगाबाईंनी जोरात श्वास घेतला. हे दृश्य पाहून उपस्थित सर्वजण स्तब्ध झाले. मृत समजलेल्या आजी जिवंत असल्याचे स्पष्ट होताच अंत्यविधीची सर्व तयारी तात्काळ रद्द करण्यात आली.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि भावनिक वातावरण निर्माण झाले. मृत्यूच्या छायेतून परतलेल्या गंगाबाईंनी दुसऱ्याच दिवशी आपला १०३ वा वाढदिवस साजरा केला. शोकाच्या तयारीत असलेले घर आनंद, कृतज्ञता आणि आश्चर्याने भरून गेले. रामटेकमध्ये ही घटना ‘मृत्यूच्या दारातून परतलेले आयुष्य’ म्हणून चर्चेचा विषय ठरली आहे.
