चिपळूण शहरातील महिला व युवतींसाठी विशेष नवदुर्गा दर्शन दौरा; शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ यांचा स्तुत्य उपक्रम
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 50 views
चिपळूण : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिपळूण शहरातील युवती, महिलांसाठी नवरात्रोत्सवानिमित्त खास मोफत नवदुर्गा दर्शन दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्र उत्सवात नऊ दिवस चालणारा हा उपक्रम श्री. उमेशदादा सकपाळ यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असून, यामध्ये शहर व परिसरातील महिला भगिनींना नऊ प्रमुख देवस्थानांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
या यात्रेद्वारे श्री सुकाईदेवी (पाग), शारदादेवी (तुरंबव), भवानीआई (टेरव), महाकाली (कुंभार्ली), आई सुकाई (खडपोली), रामवरदायनी मंदिर (दादर), झोलाई मंदिर (वालोपे), करंजेश्वरी (गोवळकोट) आणि महालक्ष्मीदेवी (मिरजोळी) अशा देवस्थानांचे दर्शन होणार आहे. यात महालक्ष्मी, करजेश्वरी, रामवरदायनी व शारदादेवी या कोकणातील महत्त्वाच्या नवदुर्गा स्थळांना विशेष दर्शन घडवले जाणार आहे. चिपळूण शहराच्या प्रत्येक विभागातून गाड्या सोडल्या जाणार आहेत. दररोज किमान २० गाड्या धावतील, असे उमेश सकपाळ यांनी सांगितले.
या संदर्भात आयोजक उमेश सकपाळ यांनी सांगितले की, “नवरात्र म्हणजे श्रद्धा, भक्ती व मातृशक्तीचे पर्व. महिलांना सुरक्षित आणि आनंददायी वातावरणात नवदुर्गांचे दर्शन घडावे, या उद्देशाने हा उपक्रम गेली अनेक वर्षे यशस्वीपणे राबवित आहोत. देवीदर्शनाचा हा उपक्रम पुण्याचेच काम आहे, असे आम्हाला वाटते. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला हा अध्यात्मिक व सामाजिक अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरेल,” असे ते म्हणाले.
या यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला भगिनी व युवतींनी आपली नावे त्वरीत आपल्या भागातील शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांकडे नोंदवावीत. तसेच अधिक माहितीसाठी उमेश सकपाळ यांच्या डीबीजे कॉलेज शेजारी असलेल्या माऊली संपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
