चिपळूण नगर परिषदेत आरोग्य तपासणी शिबिर
- by Yogesh Bandagale
- February 16, 2026
- 57 views
चिपळूण : ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त चिपळूण नगर परिषद यांच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांचा शुभारंभ सोमवारी नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराने करण्यात आला.
चिपळूण नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर अपरांत हॉस्पिटल व नगर परिषदेच्या नागरी सुविधा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांनी शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या प्रभात फेरी, वक्तृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा आदी विविध उपक्रमांची माहिती दिली. नगर परिषद सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष श्री. सकपाळ यांनी शताब्दी वर्षानिमित्त शुभेच्छा देत सर्व उपक्रमांना नगर परिषदेचे पूर्ण सहकार्य राहील, असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी संजय जाधव, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, वैशाली कदम, शिल्पा देसाई, शीतल रानडे, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, पाणीपुरवठा विभागप्रमुख रोहित खाडे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्राची हरवंदे, डॉ. स्नेहल नागरे, डॉ. शंतनू गोरे, डॉ. रूपा गरुड, डॉ. मयेकर व डॉ. भक्ती पालांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
