चिपळूणचे गोरगरिबांचे डॉक्टर अल्ताफ सरगुरोह यांचे निधन
- by Yogesh Bandagale
- December 01, 2025
- 6223 views
चिपळूण : चिपळूण शहर आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणारे डॉ. अल्ताफ सरगुरोह (वय ५०) यांचे आज मुंबई येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. सोमवारी विवाह कार्यक्रमासाठी ते मुंबईत गेले असताना अचानक प्रकृती बिघडून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळले. तत्काळ उपचार सुरू करण्यात आले, मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला.
डॉ. अल्ताफ सरगुरोह यांच्यावर त्यांच्या वडिलांचे, डॉ. नूर सरगुरोह यांचे वैद्यकीय सेवांचे संस्कार होते. गरिबांचे डॉक्टर म्हणून नावाजले गेलेले नूर सरगुरोह यांचा वारसा अल्ताफ सरगुरोह यांनी अत्यंत निष्ठेने पुढे चालवला. वडिलांच्या दवाखान्यातच त्यांनी अनेक वर्षे प्रॅक्टिस करून हजारो रुग्णांना परवडणाऱ्या दरात सेवा दिली.
अल्ताफ सरगुरोह हे अजातशत्रू स्वभावाचे, सर्वांना जवळ घेऊन काम करणारे व्यक्तिमत्त्व होते. रोटरी क्लब, चिपळूणचे ते अनेक वर्षे सक्रिय सदस्य होते. अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेली सामाजिक कामे विशेष लक्षात राहणारी ठरली. शहरातील अनेक संस्थांमध्ये ते नेहमी पुढाकार घेऊन सहभागी होत असत.
त्यांच्या अचानक जाण्याने चिपळूण शहरात शोककळा पसरली आहे. प्रामाणिकता, माणुसकी आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी ओळखला जाणारा डॉक्टर गमावल्याची तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मागे पत्नी, माजी नगरसेविका असलेल्या आई आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. डॉ. अल्ताफ सरगुरोह यांच्या निधनामुळे चिपळूण वैद्यकीय क्षेत्रासह सर्व समाजघटकांतून दु:ख व्यक्त केले जात आहे.
