खेर्डीमध्ये संभाजी दाभोळकर यांचा गौरव सोहळा उत्साहात
- by Yogesh Bandagale
- October 16, 2025
- 195 views
दाभोळकर कुटुंब म्हणजे सेवाभावी परंपरेचं जिवंत उदाहरण: आमदार शेखर निकम
चिपळूण : शहरालगतच्या खेर्डी येथील ज्येष्ठ नागरिक संभाजी दाभोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. खेर्डी विठ्ठलवाडी गणेश मित्र मंडळाच्या वतीने आणि दिशा फाउंडेशनच्या सौजन्याने खेर्डी एमआयडीसी येथे बैठक व्यवस्था आणि वाचनालय सुरू करून समाजसेवेचा नवा संदेश देण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित पाहुण्यांनी नव्याने सुरू झालेल्या वाचनालय आणि बसण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. गावातील युवक आणि वयोवृद्धांसाठी हे ठिकाण नव्या सामाजिक भेटींचे केंद्र ठरणार असल्याचे समाधानही व्यक्त करण्यात आले. याच निमित्ताने खेर्डीतील संस्कृती हॉलमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीद खेरटकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांनी संभाजी दाभोळकर यांच्या कार्याचा व आयुष्यभरातील समाजसेवेचा गौरव केला. त्यांनी आयुष्यभर गावाच्या विकासासाठी, सामाजिक कार्यक्रमांसाठी आणि शिक्षणासाठी आपला वेळ व ऊर्जेचा वापर केला असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “दाभोळकर कुटुंब हे सेवाभावी परंपरेचे जिवंत उदाहरण आहे. संभाजी दाभोळकर यांनी आपल्या कर्तृत्वाने गावात आदर्श निर्माण केला असून त्यांच्या मुलांनी त्यांचे संस्कार जपत समाजकार्यासाठी हातभार लावला आहे. वाढदिवस साजरा करताना मुलांनी केवळ सोहळा न करता, समाजासाठी उपयुक्त असे वाचनालय आणि बसण्याची व्यवस्था सुरू केली ही गोष्ट अत्यंत प्रेरणादायी आहे.”
आमदार निकम यांनी पुढे सांगितले की, “आजच्या काळात आपल्या पालकांचा सन्मान करताना समाजहिताचे काम करणे ही खरी कृतज्ञता आहे. दाभोळकर कुटुंबाने हे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.”
संभाजी दाभोळकर यांचे तीनही पुत्र आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणारे आहेत. मोठे सुपुत्र दशरथ दाभोळकर हे यशस्वी व्यावसायिक असून खेर्डीचे सरपंचही राहिले आहेत. त्यांच्या पत्नी दिशा दाभोळकर या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका असून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे.
दुसरे सुपुत्र प्रशांत दाभोळकर हे व्यावसायिक आणि प्रख्यात सायकलपटू आहेत, तर धाकटे सुपुत्र विवेक दाभोळकर हे देखील व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
या वेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन उर्फ अबू ठसाळे म्हणाले, “आज मुलांनी आपल्या वडिलांचा ७५वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला, पण मला माझ्या वडिलांचा ७५वा वाढदिवस साजरा करता आला नाही, ही एक वैयक्तिक खंत आहे. मात्र, हा सोहळा पाहून आनंद झाला.”
या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, अनिलशेठ दाभोळकर, जयेंद्रशेठ खाताते, उद्योजक एस. एम. तटकरे, नितीन (अबू) ठसाळे, उमेश सकपाळ, मिलिंद कापडी, दादासाहेब साळवी, दिलीप माटे, रमेश राणे, स्नेहा मेस्त्री, रुंदाताई दाते, सुप्रियाताई उतेकर, अजितशेठ खताते, विनोद भुरण, निलेश भुरण, बाळ दाते, गजानन जाधव, रियाज खेरटकर, राकेश दाभोळकर, रशिदा चौगुले, ओवी शेटे, सुयोग चव्हाण, राजेश मेस्त्री, राजेश सुतार, सचिन कुलकर्णी, मोहन मिरगल, निहार कोवळे आदींसह गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
