“कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये”
- by Yogesh Bandagale
- December 22, 2025
- 1448 views
निवडणुकीनंतर चिपळुणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा बॅनर चर्चेत*
चिपळूण (समिधा बांडागळे) : नगर पालिका निवडणुकीचा धुरळा अद्याप पूर्णपणे शांत झालेला नसतानाच, चिपळुणातील काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या फर्मबाहेर लावलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निवडणुकीत स्वतःसह पत्नीचाही पराभव झाल्यानंतर, या नेत्याने थेट “कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये” असा मजकूर असलेला बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे, हा बॅनर कोणत्याही कार्यक्रम, उत्सव किंवा राजकीय उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नसून निवडणूक निकालाच्या अवघ्या दुसऱ्या दिवशीच लावण्यात आल्याने त्याची शहरात खुमासदार चर्चा रंगली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, ४० ते ४२ वर्षे तन-मन-धनाने जनतेची सेवा केल्यानंतरही मतदारांनी या निवडणुकीत आपल्याला सपशेल नाकारल्याने संबंधित काँग्रेस नेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्या मनातील ही खदखद या बॅनरमधून स्पष्टपणे व्यक्त होत असल्याचे बोलले जात आहे.
“निवडणुकीत साथ दिली नाही आणि आता देणगी मागायला येता?” असा अप्रत्यक्ष रोख या बॅनरमागे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या बॅनरकडे जाणारे-येणारे नागरिक थांबून तो वाचताना दिसत असून, सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या राजकीय विश्लेषणात या बॅनरमुळे चिपळुणात एक नवा ‘राजकीय पॅटर्न’ पाहायला मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.
