काम करणाऱ्यालाच तिकीट; पालकमंत्री उदय सामंत यांचा स्पष्ट संदेश
- by Yogesh Bandagale
- November 01, 2025
- 95 views
चिपळूण : पालकमंत्र्यांच्या गाडीत फिरलो, जवळ बसलो, उजवा-डावा म्हणून नाव घेतलं गेलं म्हणून उमेदवारी नक्की मिळेल अशा कोणत्याही भ्रमात राहू नका. लोकांमधून मागणी आणि कामाची नोंद यावरच उमेदवार निश्चित होईल. एका जागेसाठी अनेक इच्छुक असतील तर थांबायची तयारी ठेवा, असे स्पष्ट वक्तव्य राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
चिपळूण शहरातील अतिथी हॉटेलच्या सभागृहात शहर व तालुका शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत सामंत यांनी इच्छुकांची नावे ऐकून घेतली तसेच त्यांच्याशी संवाद साधला. महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अनेकांची इच्छा आहे; मात्र निष्ठेने व लोकांमध्ये स्वीकृती असलेल्या उमेदवारालाच संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वेक्षण झाल्यानंतर वरिष्ठ स्तरावर निवडणुकीचे निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील चिपळूण शहर उपशहरप्रमुख अर्चना कारेकर यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गटात) प्रवेश केला. पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमास माजी आमदार संजय कदम, सदानंद चव्हाण, रश्मी गोखले, रुपेश घाग, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अण्णा कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवासेना तालुकाप्रमुख निहार कोवळे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, माजी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद झगडे, प्राजक्ताटकले आदी मान्यवर उपस्थित होते.
