इस्त्रो अभ्यास दौऱ्यासाठी रेणुका इरलेची निवड

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या “जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान” या उपक्रमांतर्गत पाग मुलांच्या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी रेणुका प्रभाकर इरले हिची इस्त्रो (ISRO) अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे पाग मुलांच्या शाळेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

विशेष म्हणजे, पाग मुलांच्या शाळेने या उपक्रमात सलग तिसऱ्या वर्षी यश संपादन केले असून, शाळेतील विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता व सातत्य अधोरेखित झाले आहे. या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक श्री. नरेश मोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी शिक्षिका पूजा धुरी मॅडम, कोतवडेकर सर आणि समीक्षा मोरे मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य केले.

कुमारी रेणुका हिच्या या यशाबद्दल तसेच तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिपळूण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय इरनक, शिक्षण विस्तार अधिकारी देसाई  व देसाई , केंद्रप्रमुख सुर्वे, तसेच पाग परिसरातील सर्व नगरसेवक व शिक्षणप्रेमींनी कुमारी रेणुका आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची गोडी वाढीस लागली असून, भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी अशा उपक्रमांत सहभागी होतील, असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.

संबंधित लेख