चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना काळभैरव देवस्थानात नवरात्र उत्सव सोहळा
- by Yogesh Bandagale
- September 21, 2025
- 69 views
चिपळूण : चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सवाचा भव्य सोहळा पारंपरिक उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५ (आश्विन शुद्ध प्रतिपदा) रोजी घटस्थापनेनंतर सुरू होणारा हा उत्सव गुरुवार, दि. २ ऑक्टोबर २०२५ (विजयादशमी) रोजी श्रींच्या शाही मिरवणुकीने आणि सीमोल्लंघनाने संपन्न होणार आहे.
या कालावधीत श्री जुना काळभैरव मंदिर, श्री देव केदारेश्वर मंदिर (वैश्यवसाहत), श्री देवी ऐकवीरा मंदिर (वडनाका), श्री देवी भवानी मंदिर, श्री कात्रादेवी मंदिर (श्री क्षेत्र गांधारेश्वर) येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी श्रींची पूजाअर्चा, संध्याकाळी धूपआरतीनंतर स्तोत्र, अष्टक पठण आणि रात्रौ ९ ते १ विविध भजन कार्यक्रम यांचा भाविकांनी लाभ घ्यावा.
कार्यक्रमांमध्ये स्थानिक तसेच पंचक्रोशीतील विविध प्रासादिक महिला व पुरुष भजन मंडळांचा सहभाग राहणार आहे. ललितापंचमी (दि. २६ सप्टेंबर) रोजी कुंकुमार्चन, कुमारिका पूजन आणि सप्तशती पठणाचे आयोजन केले असून या दिवशी कन्याशाळा चिपळूणच्या विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यही वाटप केले जाईल. शनिवार, दि. २७ सप्टेंबर रोजी पारंपरिक भोंडला (१८वे वर्ष) तसेच वारकरी भजन मंडळांचे कार्यक्रम होतील. विजयादशमीच्या दिवशी श्रींची शाही मिरवणूक, सीमोल्लंघन व शिवकालीन युद्धकलेचे प्रात्यक्षिक अशा विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उत्सवासाठी श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. किशोर शेट्ये, श्री. समीर शेट्ये, सचिव श्री. पंकज कोळवणकर, कार्यकारी विश्वस्त श्री. चंद्रशेखर लाड, श्री. सुमन्ता शिंदे तसेच नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष श्री. संतोष डांगे यांनी भाविकांना सेवाकार्यात सहभागी होण्याचे आणि नवरात्र महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केलेआहे.
