सोन्यापेक्षा चांदीने गाठली अधिक उंची: एका दिवसात 10 हजारांची वाढ, उत्तर भारतात दर पाेहोचले 2,10,000 रुपयांवर
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 38 views
मुंबई : एप्रिलमध्ये लाखाचा टप्पा गाठणाऱ्या चांदीचे दर सात महिन्यांत १८३३४० (जीएसटीसह) रुपये किलाेवर पाेहोचले. ऑक्टाेबरच्या १२ दिवसांत २० हजारांनी महागलेल्या चांदीने साेमवारी एकाच दिवसात १० हजारांची वाढ नाेंदवली. ही चांदीच्या इतिहासातील अभूतपूर्व वाढ ठरली. मागणी व पुरवठा यातील असंतुलनासह बाजारपेठेत धातुस्वरूपात चांदीच उपलब्ध नसल्याने ज्याच्याकडे माल त्याचा दर अशी स्थिती महाराष्ट्रासह देशभरात निर्माण झाली आहे. उत्तर भारतातील दिल्लीकडे चांदीचे फिजिकल मार्केटमधील दर २१०००० रुपये किलाेपर्यंत गेले असल्याची जाणकारांची माहिती आहे. एप्रिलमध्ये प्रथमच चांदीने १ लाख रुपयांचा टप्पा गाठला. त्यानंतर मेमध्ये साडेचार हजार, जूनमध्ये साडेसात हजार, जुलैत पुन्हा ५ हजार, ऑगस्टमध्ये १२ हजार, गेल्या सप्टेंबर महिन्यात २५ हजारांची वाढ नाेंदवली. तर ऑक्टाेबरमध्ये आतापर्यंत ३० हजार रुपयांनी चांदी महागली आहे. गेल्या आठवड्यातच चांदी एका दिवसात ९ हजारांनी महागली होती.
एमसीएक्सवर १५२००० तर फिजिकलमध्ये १८३००० दर
एमसीएक्स (मेटल कमाेडिटी मार्केट) अर्थात वायदा बाजारात चांदीचे प्रतिकिलाेचे दर १५२००० आहेत. परंतु त्यानुसार बुकिंग केली जाते. मात्र, फिजिकल मार्केटमध्ये (धातू देवाण-घेवाण करणारी बाजारपेठ) चांदी धातू पुरवठ्यासाठी उपलब्धच नाही, असे जळगाव जिल्हा सराफ असाेसिएशनचे अध्यक्ष गाैतम लुणिया यांचे म्हणणे आहे.
एमसीएक्स म्हणजे काय?
मेटल कमाेडिटी बाजार (एमसीएक्स) वर साेने व चांदीची प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून २५ तारखेपर्यंत नाेंदणी करता येते. प्रत्यक्षात १ किलाे धातूचे पैसे गुंतवून १० किलाे किंवा त्यापेक्षा अधिकची आगाऊ खरेदी करता येते. २६ तारखेला याचे बिलिंग हाेते. बुक धातूचे दर त्या दिवशी जे असतील त्यानुसार फरक खातेदाराला मिळताे. त्यापूर्वी ताे धातू न विकल्यास त्या व्यवहारांची रक्कम संबधित खातेदाराला भरावी लागते.
ज्याच्याकडे चांदी, त्याचे दर
प्रत्यक्षात बाजारात चांदीची प्रचंड मागणी असताना पुरवठाच हाेत नसल्याने चांदी फिजिकली उपलब्धच नाही. त्यामुळे ज्याच्याकडे चांदी आहे, त्याच्यानुसार चांदीचे दर ठरत आहे. त्यामुळे दर वेगवेगळे आहेत. ही चांदीच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. चांदीचे दर आणखी वाढू शकतील. दिवाळीपर्यंत दरात आणखी साडेपाच हजारांची वाढ हाेऊ शकते. विजय लष्करे, संचालक मुंबई बुलियन असाे.
