शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण प्रचारासाठी मुंबईत दाखल
- by Yogesh Bandagale
- January 11, 2026
- 104 views
चिपळूण : राज्यातील प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी वॉर्ड प्रभारी शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पंचायत समितीचे माजी गटनेते राकेश शिंदे देखील उपस्थित होते. धारावीतील प्रभाग क्रमांक १८७ आणि १८८ या दोन प्रभागांसाठी सदानंद चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत असून, राज्यातील राजकीय रंगभूमीत शिवसेना–भाजप महायुती, शिवसेना (उद्धव गट), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची महविकास आघाडी सक्रिय आहे. काँग्रेस या ठिकाणी स्वतंत्र लढत देत आहे. राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहे.
प्रचाराच्या धामधुमीत चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण प्रभाग १८७ व १८८ या दोन्ही प्रभागांचे प्रभारी म्हणून काम करीत आहेत. आज संध्याकाळी त्यांनी प्रभाग १८८ मधील शिवसेनेचे उमेदवार भास्कर शेट्टी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली, तर प्रभाग १८७ मधील उमेदवार वकील शेख यांच्या कोपरा सभेत मार्गदर्शन केले.
दोन्ही प्रभागातील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून, सदानंद चव्हाण यांनी उमेदवारांच्या टीमला उपयुक्त सूचना दिल्या. प्रभाग १८७ मध्ये शिवसेनेची मुख्य लढत उबाठा गट आणि काँग्रेस सोबत आहे, तर प्रभाग १८८ मध्ये काँग्रेस आणि MIM सोबत शिवसेना लढत आहे. मराठी मतदारांच्या भेटी–गाठींवर लक्ष केंद्रित करून, निर्णायक मते शिवसेनेकडे वळवण्यासाठी सदानंद चव्हाण आपले कौशल्य लावत आहेत.
