लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीची मुदत वाढवली; महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांची घोषणा
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 103 views
ठाणे : लाडकी बहीण योजनेतीलसर्व पात्र महिलांना ई केवायसी (e-KYC) करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होते, मात्र आता, लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. लाडक्या बहिणींनानोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत आहे. तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढवून देऊ, असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. काल (सोमवारी, ता १३) ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यावेळी आदिती तटकरेंनी उपस्थिती लावली. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया होत आहे. आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांची ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
