निवडणुकीला महायुती फिस्कटली, नितेश राणेंमुळेच सिंधुदुर्गात युती नाही

सिंधुदुर्ग : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सिंधुदुर्ग  जिल्ह्यात महायुती करण्यास पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नाहीत, त्यामुळे युती होऊ शकली नाही, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्र निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. यापूर्वी, मंत्री नितेश राणे यांनीही याबाबत माहिती देताना स्वबळाची तयारी असल्याचे म्हटले होते. आता, राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे पुढील 10 दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर करत अर्ज देखील भरावे लागणार आहेत.

निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केल्यानंतर राजकीय पक्षाकडून तयारी सुरू आहे, राजकीय पक्षाचे नेते उमेदवार निश्चित करण्यात व्यस्त असताना, महायुती, महाविकास आघाडीचा घोळ अद्यापही कायम आहे. मात्र, काही जिल्ह्यात महायुतीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. त्यामध्ये, सिंधुदुर्ग, रायगडपुणेबीड, जळगाव जिल्ह्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणेंनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल असे म्हटल्यानंतर आता शिवसेनेनंही दंड थोपटले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे इच्छुक नसल्याने युती झाली नाही. आमदार दिपक केसरकर यांनी तसा खुलासा केला आहे. युतीसाठी उदय सामंत आणि मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सुद्धा भेटलो. मात्र, पालकमंत्री नितेश राणे बहुदा इच्छुक नसल्याने युती झाली नाही, असा खुलासाच आमदार दीपक केसरकरांनी केला आहे.

 

संबंधित लेख