दि. बा. पाटील : भूमिपुत्रांचे लढवय्या नेते
- by Yogesh Bandagale
- October 08, 2025
- 58 views
✍️ योगेश बांडागळे, चिपळूण
राज्यातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण कोणत्या महान व्यक्तिमत्त्वाच्या नावावर व्हावे, यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय व सामाजिक घमासान पेटले आहे. राज्य सरकारकडून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नाव पुढे आला होता. मात्र स्थानिक भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्त नागरिकांनी आपल्या नेता, लोकनेते दिनकर बाळू (दि. बा.) पाटील यांच्या नावावर ठामपणे दृष्टी ठेवली होती. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव अधिक योग्य ठरेल असे मत व्यक्त केले. अखेर सरकारने या प्रकरणावर निर्णय घेतला असून, अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा सुरू आहे.
दि. बा. पाटील : भूमिपुत्रांचे लढवय्या नेते
दि. बा. पाटील यांचे संपूर्ण नाव दिनकर बाळू पाटील असून, त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील जासई या छोट्या गावात 1926 साली झाला. त्यांचे वडील बाळू पाटील शिक्षक होते आणि शेतीदेखील करत. शिक्षणात गती असलेल्या दिनकर पाटील यांनी पुण्यात वकिलीचे शिक्षण घेतले. तरुण वयातच त्यांनी सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधले आणि तिथूनच त्यांचा सार्वजनिक जीवनाचा प्रवास सुरू झाला.
शेतकरी कामगार पक्षातून कारकीर्द
दि. बा. पाटील यांनी आपली राजकीय कारकीर्द शेतकरी कामगार पक्षातून (शेकाप) सुरू केली. पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी स्थानिक प्रशासनात आपली ठळक छाप पाडली. पनवेल-उरण मतदारसंघातून चार वेळा आमदार आणि दोन वेळा लोकसभेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. विधानसभेत ते विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत राहिले. त्यांच्या भाषणांमध्ये तळागाळातील शेतकरी, कामगार आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज स्पष्ट ऐकू येत असे. त्यांच्या नेतृत्वामुळे राज्य सरकारने दिलेला “उत्कृष्ट वक्ता” हा पहिला पुरस्कार त्यांच्याच नावावर नोंदवला गेला.
नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे तारणहार
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहर उभारणीचा आराखडा तयार झाल्यावेळी हजारो शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. त्या काळात दि. बा. पाटील हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, पुनर्वसनाची हमी मिळावी, यासाठी त्यांनी मोठे आंदोलन केले आणि तुरुंगवास देखील भोगला. त्यांच्या संघर्षामुळे नवी मुंबई व रायगड परिसरातील स्थानिक लोक त्यांना ‘भूमिपुत्रांचा तारणहार’ म्हणून ओळखतात. आगरी, कोळी व शेतकरी समाजातील लोक त्यांना प्रेमाने “दिबां” म्हणतात. त्यांच्या आवाहनावर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरायचे.
शिवसेनेत प्रवेश आणि समाजकार्याची अखेरची फेरी
1999 मध्ये दि. बा. पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र वयोमानामुळे त्यांनी फार सक्रिय राजकारण केले नाही. तरीही ते सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सतत सक्रिय राहिले. आगरी समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनिष्ट चालीरीतींना त्यांनी विरोध केला. ‘आगरी दर्पण’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवले. त्यामुळे आजही त्यांचा कार्याचा ठसा स्थानिकांच्या मनात जिवंत आहे.
नामनिर्देशनासाठी आंदोलन व सरकारची तयारी
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीत हजारो शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आहे. भूमिपुत्रांच्या पिढीला वाटते की ज्यांनी आमच्यासाठी लढा दिला, त्यांचेच नाव या प्रकल्पावर असावे. त्यामुळे दि. बा. पाटील यांच्या नावासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन पेटले आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात त्यांच्या स्मृती जपण्यासाठी पुतळे, चौक आणि स्मारके उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर सरकारकडून देखील दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
दि. बा. पाटील हे नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांसाठी लढलेले, शेतकरी व कामगारांचे वकिल, समाजकारणातील निष्ठावान नेता म्हणून ओळखले जातात. विमानतळाच्या नामनिर्देशनात त्यांचे नाव येणे ही फक्त ऐतिहासिक घटना नाही, तर प्रकल्पग्रस्तांचा, भूमिपुत्रांचा न्याय आणि स्थानिक इतिहास जिवंत ठेवण्याचा एक प्रतीकात्मक निर्णय मानला जातो.
