धनेश पक्षी पर्यटनाचा नवा मार्ग ठरू शकतो! विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांचा विश्वास
- by Yogesh Bandagale
- October 07, 2025
- 168 views
वन्यजीव सप्ताहनिमित्त चिपळूणमध्ये चर्चासत्र
पक्षी व प्राणी वैभव जपण्यासाठी वन्यजीव उपचार केंद्र गरज व्यक्त
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणातील निसर्गसंपन्नतेचा विचार करता, येथील जैवविविधता आणि पर्यावरणीय वैभव पर्यटकांना आकर्षित करण्यास पुरेसे सक्षम आहे. अरुणाचल प्रदेशनंतर सर्वाधिक वृक्ष लागवडीखालील क्षेत्र असलेला रत्नागिरी जिल्हा, आता केवळ निसर्गरक्षणापुरता मर्यादित न राहता, पर्यावरणपूरक पर्यटनासाठीही महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले.
वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहनिमित्त चिपळूणमध्ये चर्चासत्र ण येथील वन विभागाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहात पार पडले. या वेळी वनरक्षक प्रियांका लगड, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे रामशेठ रेडीज यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहानवाज शहा यांनी केले.
गिरीजा देसाई यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही धनेश पक्ष्याच्या आठ प्रजाती आढळतात. हा पक्षी पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरू शकतो. "ताडोबामध्ये वाघांसाठी जगभरातून पर्यटक येतात, तसाच धनेश पक्ष्याच्या माध्यमातून कोकणातील पक्षी व प्राणी वैभव पाहण्यासाठी देखील जगभरातील अभ्यासक आणि पर्यटक येऊ शकतात," असे त्या म्हणाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी राजापूर व दापोली येथे वन्य प्राण्यांसाठी वन्यजीव उपचार केंद्र (ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर) स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. "शासकीय पातळीवर या केंद्रांसाठी प्रयत्न सुरू असून, लवकरच ही सुविधा कार्यान्वित व्हावी, यासाठी वन विभाग पुढाकार घेत आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
याशिवाय, खेड तालुक्यातील सातविन येथे एनआयसी सेंटर उभारण्यात येत असून, येथे अत्याधुनिक पद्धतीने प्राण्यांची माहिती मिळणार आहे. जैतापूर येथे ‘मंगरुज’ या दुर्मिळ प्राण्यासाठी विशेष एनआयसी सेंटर सुरू होणार आहे. तसेच आरे-वारे आणि दापोली-मुरूड येथे इको-टुरिझम प्रकल्प उभारले जाणार आहेत.
कोकणातील फक्त १.२१ टक्के जमीन वनविभागाच्या अखत्यारीत आहे, तर उर्वरित जागा खाजगी मालकीची आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये अडचणी येतात. उन्हाळ्यात पाण्याच्या अभावामुळे पक्षी आणि प्राण्यांचे जीव जातात. "सीएसआर निधीच्या माध्यमातून खाजगी जमिनीवरही अभ्यास करून पाणवठे उभारण्याची योजना आखली आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
वानर त्रासावर उपाय म्हणून हिमाचल प्रदेशहून दोन संशोधकांना बोलावून जीपीएस ट्रॅकिंगच्या सहाय्याने तीन हजार सहाशे वानरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, यामध्ये एकाही वानराचा मृत्यू झाला नाही, हे विशेष यश आहे, असे त्या म्हणाल्या.
सापांच्या बाबतीत सुद्धा जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सर्पमित्र साप पकडताना चुकीच्या पद्धती वापरतात, त्यामुळे सर्प जखमी होतात. "सर्पमित्रांना प्रशिक्षण देणे व पकडलेल्या सर्पांची माहिती वन विभागाला देणे अनिवार्य करण्यात येणार आहे," असे त्या म्हणाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार वणवे लागतात. यातील ९० टक्के वणवे मानवनिर्मित असतात. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात १० गावांमध्ये वणवाप्रवण क्षेत्रात जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. "देवराया जतन करणे हे आपले कर्तव्य असून, त्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत," असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध संस्थांचे प्रतिनिधी, पर्यावरण आणि पर्यटन क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. कोकणातील जैवविविधतेचे जतन व संवर्धन करताना पर्यटनालाही चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित करत, हा परिसर जागतिक नकाशावर उभा करण्याचा निर्धार या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.
