ठाकरे बंधूंची युती जाहीर; मुंबई महापालिकेसाठी उद्धव-राज एकत्र

मुंबई | प्रतिनिधी

राज्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अधिकृतपणे जाहीर होणार आहे. या युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत फक्त “उद्या १२ वाजता” असे लिहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ठाकरे बंधूंच्या हातात गुलाबांचा मोठा गुच्छ दिसत असून युतीची औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, विशेषतः मुंबई महापालिकेवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. भाजपने मुंबई मनपासाठी कंबर कसली असताना ठाकरे बंधूंची युती राजकीय समीकरणे बदलणारी ठरू शकते, असे मानले जात आहे.

दरम्यान, या युतीवर भाजप नेते राम कदम यांनी तीव्र टीका केली आहे. “राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता, तर त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले. आज गरज असल्याने उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या दारी गेले आहेत,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “हे कितीही एकत्र आले तरी त्यांचा आकडा ३५-४० च्या पुढे जाणार नाही,” असेही ते म्हणाले.

ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून उद्याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख