“खरी शिवसेना कुणाची?” – सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी उद्या

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असलेल्या ‘खरी शिवसेना कुणाची?’ या ऐतिहासिक प्रश्नावर 8 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडणार आहे. गेली तीन वर्षे चालत असलेल्या वादावर न्यायालयाने शेवटी निकालासाठी अंतिम टप्प्यात सुनावणी निश्चित केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बागची यांच्या खंडपीठासमोर दोन्ही गटांचे अंतिम युक्तिवाद ऐकण्यात येणार आहेत.

शिवसेनेच्या नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटांमध्ये तणाव वाढला होता. 2022 मधील बंडखोरीनंतर निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह दिले होते, ज्यावर उद्धव ठाकरे यांनी आव्हान नोंदवले होते.

वकील असिम सरोदे यांनी सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अप्रत्यक्ष टीका करत मोदी आणि शिंदे यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असलेल्या विमानतळाच्या उद्घाटनावर न्यायालयाने सत्तेच्या हवेत असलेल्या शिंदे यांचे विमान जमिनीवर पाडणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.”

उद्धव ठाकरे गटाने जुलैमध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यात “शिवसेना नाव आणि चिन्हावरील वादावर लवकर निर्णय द्या” अशी मागणी होती. मागील काही सुनावण्या झाल्यानंतर आता उद्या अंतिम निकालाची अपेक्षा आहे.

संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्षही या सुनावणीकडे लागलेले आहे.

संबंधित लेख