कोकणात भाजपचा शिंदेंना दे धक्का; नितेश राणेंचा स्वबळाचा नारा

सिंधुदुर्ग : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पॅनलमध्ये युतीच्या चर्चांना वेग आला असून, कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. अशातच, सिंधुदुर्गचे मंत्री नितेश राणे यांनी थेट “स्वबळावर लढणार” असा नारा देत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

राणे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू. प्रत्येकाला आपली संघटना वाढवण्याची संधी मिळत असेल, तर त्याचं स्वागतच करायला हवं. आमची युती झाली तर विरोधकांना रेडिमेड उमेदवार मिळतात. त्यामुळे प्रत्येकाने स्वबळावर तयारी करावी.”

त्यांनी पुढे स्पष्ट केलं, “महाविकास आघाडीकडे सिंधुदुर्गात उमेदवार नाहीत. ते आमची युती केव्हा तुटते आणि बंडखोरी कधी होते याच वाट बघत आहेत. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणं योग्यच ठरेल. मात्र, एकमेकांवर टीका न करता मैत्रीपूर्ण पद्धतीने स्पर्धा व्हावी, अशी माझी अपेक्षा आहे.”

राणेंनी भाजप आणि शिंदे गटात एकजूट असल्याचेही सूचित केले. “आम्ही मॅच्युअर्ड लोक आहोत. राज्याच्या हितासाठी उद्या एकत्र यायचं आहे, हे आम्हाला ठाऊक आहे,” असं ते म्हणाले. तरीदेखील, त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचा हा “स्वबळ”चा नारा म्हणजे शिंदे गटाला अप्रत्यक्ष धक्का असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये राबवला जाणार का? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या “९६ लाख बोगस मतदार” या मुद्द्यावरही राणेंनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं, “राज ठाकरे मुद्देसूद बोलतात. त्यांच्या माध्यमातून जे काही माहिती समोर येते, त्यावर लोक विचार करतात. पण लोकसभेनंतर अचानक हे आरोप का झाले? हा प्रश्न विचारायलाच हवा.”

राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या या स्वबळाच्या घोषणेमुळे महायुतीच्या अंतर्गत समीकरणांवर मोठा परिणाम होणार हे निश्चित दिसत आहे.

संबंधित लेख