केंद्रीय मंत्रिमंडळाची मोठी घोषणा : आठवा वेतन आयोग स्थापन
- by Yogesh Bandagale
- October 28, 2025
- 76 views
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या आयोगाच्या शिफारशींमुळे सुमारे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि ६९ लाख पेन्शनधारकांना थेट लाभ होणार आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाच्या संदर्भ अटींनाही मंजुरी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा असतील. आयआयएम बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ सदस्य तर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विभागाचे विद्यमान सचिव पंकज जैन हे सदस्य-सचिव असतील.
आयोगाला त्याच्या स्थापनेपासून १८ महिन्यांच्या आत शिफारशी सादर करण्याचे निर्देश आहेत. या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने जानेवारी २०२५ मध्ये या आयोगाची घोषणा केली होती. यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्ते, सेवा अटी, निवृत्तीवेतन यामध्ये आवश्यक बदलांचा अभ्यास करून सुधारित शिफारशी करणे हे आयोगाचे प्रमुख काम असेल.
या निर्णयामुळे कर्मचारी वर्गात समाधानाची भावना असून वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर याकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
