चिपळूणमध्ये सुवर्ण मुकुटाची भव्य शोभायात्रा; गोवळकोट देवीला अर्पण
- by Yogesh Bandagale
- February 23, 2026
- 168 views
चिपळूण : भाविकांनी श्रद्धेने गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व आदिशक्ती श्री करंजेश्वरी देवस्थानासाठी अर्पण केलेल्या सुवर्ण मुकुटाची रविवारी सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात हा सुवर्ण मुकुट गोवळकोट येथील देवस्थानात नेण्यात आला.
देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत तसेच पेठमाप, माजरेकाशी आणि गोवळकोट परिसरातील हजारो भाविकांच्या सहभागाने शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिपळूण येथील श्री जुना काळेश्वर देवस्थानातून वाजत-गाजत शोभायात्रेला प्रारंभ झाला. शिवश्रीला अभिवादन करत चिंचवणकर बाजारपेठ, बाजारपेठ मार्गे गोवळकोट रोडने मिरवणूक देवस्थानात दाखल झाली.
लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला होता. ढोल-ताशे, टाळ-मृदुंगांचा गजर, जयजयकाराच्या घोषणा आणि भगवे झेंडे यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. देवस्थान परिसरात आगमन होताच आरती करण्यात आली.
२८ फेब्रुवारीपासून देवस्थानाचा चार दिवसीय शिमगा महोत्सव सुरू होत असून, त्यानिमित्त देवीला अर्पण करण्यासाठी हा सुवर्ण मुकुट तयार करण्यात आला आहे. भाविकांच्या देणगीतून साकारलेला हा मुकुट विशेष आकर्षण ठरला. फुलांनी सजवलेल्या वाहनातून देवीच्या चांदीच्या पालखीत सुवर्ण मुकुट ठेवण्यात आला होता, ज्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
येत्या शिमगा महोत्सवात हा सुवर्ण मुकुट पालखीत विराजमान राहणार असून, देवस्थानाच्या वतीने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सुवर्ण मुकुटाच्या या शोभायात्रेमुळे शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
