रायगडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा मुलगा यूपीएससी आठवा
- by Yogesh Bandagale
- October 01, 2025
- 292 views
अलिबाग : सोलापूरच्या सुपुत्राने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. एकूण 12 जागांसाठी देशभरातून 4 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा परीक्षा दिली होती. या प्रचंड स्पर्धेतून मयुरेश यांनी केवळ यशच मिळवले नाही तर आठवा क्रमांक मिळवत महाराष्ट्राला एकमेव प्रतिनिधित्वही मिळवून दिले आहे.
मयुरेश यांच्या या यशानंतर सोलापूरसह संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण असून, कष्ट, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश नक्की मिळते, हे त्यांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
प्रशासकीय परंपरेचा वारसा
मूळचे सोलापूरचे असलेले मयुरेश हे सध्या रायगड जिल्ह्यात अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या घरात प्रशासकीय परंपरेचा वारसा असून, आजोबा अंगद वाघमारे हेही उपजिल्हाधिकारी होते. त्यामुळे शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा हे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्यात रुजले. सुयश विद्यालयात प्राथमिक शिक्षण, संगमेश्वर कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले. जागतिक दर्जाचे हे शिक्षण घेत असतानाच त्यांनी भारतात परतल्यावर प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याचा निश्चय केला.
युपीएससीच्या या स्पर्धा परीक्षेची लेखी चाचणी जून 2025 मध्ये झाली होती. याचा निकाल 9 सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर 16 सप्टेंबरला उमेदवारांची वैद्यकीय परीक्षा झाली. सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतर अखेर अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात सोलापूरच्या मयुरेशने देशात आठवा क्रमांक मिळवत महाराष्ट्राला गौरव मिळवून दिला. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील महत्त्वाची परीक्षा मानली जाते. त्यामुळे या यशानंतर मयुरेश यांची नियुक्ती केंद्रीय वित्त मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँक यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये होऊ शकते.
सोलापूर, रायगडात आनंद
मयुरेश यांच्या यशामागे घरच्यांचे प्रेरणादायी योगदान आहे. वडील भारत वाघमारे हे राज्य प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असून, कामातील शिस्त, पारदर्शकता आणि जनतेशी जवळीक यामुळे त्यांनी चांगली छाप निर्माण केली आहे. या सर्व गुणांचा प्रभाव मयुरेश यांच्या अभ्यास पद्धतीत आणि आयुष्याच्या दृष्टीकोनात दिसून येतो. त्यांच्या यशाबद्दल सोलापूर आणि रायगड परिसरात मोठा अभिमान व्यक्त होत आहे.
परदेशात उच्च शिक्षण
या यशामुळे महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना नवीन प्रेरणा मिळाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या मुलांनाही प्रशासकीय सेवेत मोठे स्थान मिळू शकते, हे मयुरेश यांनी दाखवून दिले आहे. परदेशात उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी भारतात राहून देशसेवेची वाट निवडली. त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या मातीतल्या कष्टाळू वृत्तीला नवे रूप मिळाले आहे. राज्यातील युवकांना कष्ट, आत्मविश्वास आणि सातत्य या त्रिसूत्रीवर चालल्यास कोणतीही स्पर्धा मोठी नाही, हा धडा त्यांच्या कामगिरीतून मिळाला आहे. युपीएससी परीक्षेत आठवा क्रमांक पटकावून महाराष्ट्राचा मान उंचावणाऱ्या मयुरेश वाघमारे यांचे राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
