चिपळूण–संगमेश्वर मतदारसंघातील रस्ते कामांना २५ कोटींची मंजुरी
- by Yogesh Bandagale
- March 06, 2026
- 25 views
चिपळूण : महाराष्ट्र राज्याच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पात चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी सुमारे २५ कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्त्यांचे मजबुतीकरण, सुधारणा व डांबरीकरणाची कामे करण्यात येणार आहेत.
मतदारसंघातील रस्ते वाहतूक अधिक सुव्यवस्थित व्हावी यासाठी आमदार शेखर निकम यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे या कामांना राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
मंजूर करण्यात आलेली प्रमुख कामे
१) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात चिपळूण–गुहागर बायपास रस्ता (रा.मा. १३६ अ) कि.मी. ०/०० ते ३/५०० दरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरण – २.५० कोटी रुपये
२) चिपळूण तालुक्यातील खेर्डी–टेरव–कामथे रस्ता (प्रजिमा १०९) कि.मी. ०/०० ते ८/५०० मध्ये सुधारणा व डांबरीकरण – ५.९० कोटी रुपये
३) गणेशखिंड–सावर्डा–दुर्गवाडी–तळवडे रस्ता (प्रजिमा ३३) विविध टप्प्यांत मजबुतीकरण व डांबरीकरण – ४.८० कोटी रुपये
४) पिंपळी–नांदिवसे रस्ता (प्रजिमा २३) कि.मी. ०/०० ते ३/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण – १.२० कोटी रुपये
५) संगमेश्वर तालुक्यातील साखरपा–देवरुख–संगमेश्वर रस्ता (रा.मा. १६६) कि.मी. १६/०० ते ३२/०० दरम्यान डांबरीकरण – ६.५० कोटी रुपये
६) आरवली–मुरडव–कुंभारखाणी–कुचांबे–रातांबी–राजीवली रस्ता (प्रजिमा ४४) कि.मी. १६/०० ते २३/०० मध्ये सुधारणा, डांबरीकरण तसेच पुलाची दुरुस्ती – २.१० कोटी रुपये
७) देवरुख–ओझरे–काटवली–विघ्रवली–सोनवडे–मुचरी–कळंबस्ते रस्ता (प्रजिमा ४९) कि.मी. २०/०० ते २५/०० मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण – २.०० कोटी रुपये
दरम्यान, या कामांना मंजुरी दिल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार मानले.
या निधीमुळे चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील अनेक गावांतील रस्ते सुधारले जाणार असून स्थानिक नागरिकांना वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे.
