सलमान खानने ‘बॅटल ऑफ गलवान’चे पहिले शेड्यूल पूर्ण केले
- by Yogesh Bandagale
- September 20, 2025
- 73 views
मुंबई : अभिनेता सलमान खानने आपल्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचे पहिले शेड्यूल नुकतेच लडाखमध्ये पूर्ण केले आहे. थंड हवामान, कमी ऑक्सिजन पातळी आणि सिंधू नदीतून पोहणे यांसारख्या कठीण परिस्थितीत शूटिंग झाल्यामुळे हा अनुभव संपूर्ण टीमसाठी संस्मरणीय ठरला. शूटिंग पूर्ण करून सलमान मुंबईत परतला असून, दुसरे शेड्यूल मुंबईत होणार आहे.
मात्र दुसरे शेड्यूल तात्पुरते लांबणीवर पडले आहे. काही वृत्तांनुसार, सलमान काही आरोग्य समस्यांशी झुंजत असून, त्यामुळे त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, दिव्य मराठीच्या सूत्रांनी हे वृत्त फेटाळले असून, सलमानने आरोग्याच्या कारणामुळे ब्रेक घेतलेला नाही, तर मुंबईतील सेट तयार होण्यास वेळ लागत असल्याने शूटिंग पुढे ढकलले आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, सलमानने लडाखमध्ये अत्यंत प्रतिकूल वातावरणात शूटिंग केले. दरम्यान, दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी लडाख शूटचे काही पडद्यामागील फोटो-व्हिडिओ शेअर करत तिथल्या आव्हानात्मक परिस्थितीचा उल्लेख केला.
सलमान खानची निर्मिती कंपनी या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात अभिनेत्री चित्रांगदा सिंग सलमानसोबत झळकणार असून अनेक नवीन चेहरेही दिसतील. सलमान या चित्रपटात कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारणार आहे. संगीत दिग्दर्शन हिमेश रेशमिया करणार आहेत.
हा चित्रपट २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय व चिनी सैन्यात झालेल्या प्राणघातक चकमकीवर आधारित आहे. विशेष म्हणजे, ही लढाई एकही गोळी न चालवता, तब्बल १५,००० फूट उंचीवर झाली होती.
