संघर्षातून उभी राहिलेली गटशिक्षणाधिकारी

 

ज्यांच्या डोळ्यांत शिक्षणाची तळमळ, मनात जिद्द आणि कृतीत निष्ठा असते, त्या व्यक्तींच्या जीवनप्रवासात येणाऱ्या अडचणी केवळ क्षणिक ठरतात. संघर्ष हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो; पण तोच संघर्ष त्यांच्या यशाचा भक्कम पाया बनतो. अशाच संघर्षमय, प्रेरणादायी आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास म्हणजे मा. श्रीम. सशाली सिद्धार्थ मोहिते मॅडम यांचा प्रवास होय. आज त्या स्ववानिवृत्त होत आहेत, त्यांच्याविषयी थोडक्यात...

मा. श्रीम. सशाली सिद्धार्थ मोहिते (पूर्वाश्रमीच्या ललिता धोंडीराम जाधव) यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९६८ रोजी कोकरे बौद्धवाडी, ता. चिपळूण येथे एका श्रमजीवी, कष्टकरी व संस्कारक्षम कुटुंबात झाला. वडील श्री. धोंडीराम जाधव आणि आई श्रीमती सुनंदा जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल सामाजिक-आर्थिक परिस्थितीत संसार उभा केला.

त्या काळात बहुजन समाजातील अनेक कुटुंबांची परिस्थिती हलाखीची होती. शिक्षण अर्धवट सोडून मजुरी करणे हीच जीवनशैली होती. स्वतः वडील बालमजूर म्हणून काम करत मोठे झाले. मोठ्या बहिणीच्या मदतीने ते मुंबईला गेले आणि केंद्र शासनाच्या सेवेत लिफ्ट ऑपरेटर म्हणून कार्यरत झाले. अल्प पगार, एकत्र कुटुंब आणि साधी राहणी—पण शिक्षणाविषयी अढळ श्रद्धा!

आई गृहिणी असली तरी परिस्थितीमुळे तिलाही मजुरी करावी लागे. मात्र संसाराचा गाडा ओढताना मुलांच्या शिक्षणात कसूर होऊ दिली नाही. घर पेंढारू, परिस्थिती बेताची; पण घरात शैक्षणिक वातावरण समृद्ध होते. वडील तिसरी आणि आई पाचवीपर्यंत शिकलेले—परंतु शिक्षणाचे महत्त्व पूर्ण जाणणारे.

मुलगा-मुलगी भेदभाव न मानता तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे, लहान वयात मुलींची लग्ने करू नयेत, हे त्यांचे प्रगल्भ विचार होते. मुलांनी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे, पाढे म्हणणे, धडे वाचून दाखवणे, स्वच्छतेच्या सवयी—अशा अनेक संस्कारांचे बीज बालपणातच पेरले गेले. हाच संस्कार पुढे यशाच्या वृक्षात फुलला.

कुटुंबाची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा

संस्कारांची ही समृद्धी पुढील पिढीत अधिकच बहरली. बंधू श्री. रमेश जाधव यांनी मुंबईतील व्ही.टी.आय. कॉलेजमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पुढे अमेरिकेत एम.बी.ए. करून तेथे उच्च पदावर कार्यरत आहेत. धाकटी बहीण स्मिता डॉक्टर असून नेदरलँडमध्ये आपल्या कुटुंबासह स्थायिक आहेत. मोहिते मॅडम यांची दोन्ही मुलेही तितकीच गुणवंत आहेत. मुलगा सागरने रचना कॉलेज, मुंबई येथून आर्किटेक्चर पदवी पूर्ण करून ऑस्ट्रेलियात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तो एक उत्तम मूर्तिकारही आहे. कन्या पूजा पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत कार्यरत असून तेथे स्थायिक आहे. संस्कार, शिक्षण आणि कष्ट यांच्या बळावर कुटुंबाचा झालेला हा उत्कर्ष खरोखर प्रेरणादायी आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रारंभ

जून १९८७ मध्ये, वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी, डी.एड.चा निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी आपल्या शिक्षण घेतलेल्या कोकरे हायस्कूलमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यारंभ केला. परंतु आपल्या शिक्षकांच्या पदोन्नतीत अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी स्वखुशीने ती नोकरी सोडली—हा त्यांच्या नम्रतेचा आणि कृतज्ञतेचा उत्तम नमुना आहे.

जिल्हा परिषद निवड मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होऊन डिसेंबर १९८७ मध्ये त्या चिपळूण तालुक्यातील निरबाडे निर्मळवाडी या दुर्गम शाळेत उपशिक्षक म्हणून रुजू झाल्या. दुर्गम भाग, मर्यादित साधनसामग्री—पण कामावरील निष्ठा अबाधित.

सेवेत असतानाच त्यांनी B.A., M.A., B.Ed., M.Ed. अशी पदवी व पदव्युत्तर शिक्षणे पूर्ण केली. शिक्षणाची ओढ आणि स्वतःला अद्ययावत ठेवण्याची वृत्ती यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.

प्रशासकीय जबाबदाऱ्यांतील कर्तृत्व

ऑक्टोबर २००८ मध्ये सरळ सेवा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. गुहागर व चिपळूण तालुक्यांत त्यांनी विस्तार अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्य केले.

२०१५ मधील निर्णायक प्रसंग

मार्च २०१५ च्या बोर्ड परीक्षेत एका पेपरच्या दिवशी प्रश्नपत्रिका कमी पडण्याचा गंभीर प्रसंग उद्भवला. अशा वेळी धाडस, संयम आणि निर्णयक्षमता दाखवत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून परीक्षा सुरळीत पार पाडली. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ दिले नाही. त्यांच्या या कार्याची प्रशासकीय स्तरावर दखल घेण्यात आली आणि त्यांचे कौतुक झाले.

सामाजिक जाणीव आणि उपक्रमशीलता

गुहागर तालुक्यातील चिखली बीटमध्ये त्यांनी शैक्षणिक चळवळ उभी केली.

६ डिसेंबर २०१० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची स्थापना.

त्याच दिवशी मरणोत्तर देहदानाचा संकल्प—सामाजिक जाणीवेचा अनोखा संदेश.

विद्यार्थ्यांना दूरवर चालत जावे लागू नये म्हणून नवीन शाळांचे प्रस्ताव, पाठपुरावा व मंजुरी—तीन वर्षांत पाच नवीन शाळा सुरू.

त्यामुळे लहान मुलांची पायपीट थांबली आणि अनेक डी.एड. उमेदवारांना रोजगार मिळाला.

सावर्डे बीटमध्ये “नवी दृष्टी, नवा विचार – ध्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा” हे ब्रीद स्वीकारून त्यांनी आनंददायी शिक्षण, विद्यार्थी प्रश्ननिर्मिती, ज्ञानकुंभ, शिक्षक कार्यशाळा, स्वसंरक्षण उपक्रम, रेनवॉटर हार्वेस्टिंग, गुणवत्तेचा लेखाजोखा आदी अनेक अभिनव कार्यक्रम राबवले.

मानवी नात्यांची श्रीमंती

प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी शिक्षक, अधिकारी, पालक व ग्रामस्थांशी स्नेहबंध निर्माण केले. समता, स्वातंत्र्य व बंधुता या संविधानिक मूल्यांची जपणूक करत समाजाशी बांधिलकी कायम ठेवली.

सहचार्‍याचे पाठबळ

त्यांच्या यशस्वी प्रवासात पती मा. सिद्धार्थ मोहिते (सेवानिवृत्त आगार प्रमुख, चिपळूण आगार) यांनी मोलाची साथ दिली. कुटुंबाचा आधार असल्यामुळेच त्या समाजकार्यात अधिक प्रभावीपणे कार्य करू शकल्या.

सेवानिवृत्ती – पण कार्याचा नवा अध्याय

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जन्मगावी कोकरे येथे सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विविध स्तरांवर झालेला त्यांचा गौरव म्हणजे त्यांच्या कार्याची खरी पोचपावती आहे.

मा. सशाली मोहिते मॅडम यांचा जीवनप्रवास हा केवळ एका व्यक्तीचा इतिहास नाही; तो संघर्ष, जिद्द, शिक्षणनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रेरणादायी दस्तऐवज आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहत शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन साधणारे त्यांचे कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल.

त्यांच्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि समाजसेवेची अखंड ऊर्जा लाभो—हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

-संदेश स. सावंत
मु.पो. सावर्डे, ता. चिपळूण
95189 81459

संबंधित लेख