दिवाळी यंदा चार दिवस
- by Yogesh Bandagale
- October 14, 2025
- 58 views
दिवाळीत मंगळवारी व बुधवारी गुरुपुष्यामृत योग आहे. सोमवारी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपासून अमावस्येला सुरुवात होत आहे. यंदा २० ऑक्टोबरला सायंकाळी ५.४२ ते ८.१४ वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन मुहूर्त असल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
यापूर्वी पहिल्यांदा २८ ऑक्टोबर १९६२, १७ ऑक्टोबर १९६३ या दोन्ही वर्षी अमावास्या लक्ष्मीपूजनापूर्वी संपली होती. १ नोव्हेंबर २०२४ आणि २१ ऑक्टोबर २०२५ ला असाच योग आला आहे. मागील ६३ वर्षांत चौथ्यांचा असा संभ्रम निर्माण झाला आहे.
प्रदोष काळात अमावस्या
दाते पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले की, 'नरकचतुर्दशीला प्रदोष काळात अमावस्या असून दुसऱ्या दिवशी २१ ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून सायंकाळपर्यंत अमावास्या राहील. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन धर्मशास्त्र संमत असून मंगळवारीच सायंकाळी व प्रदोष काळात (सूर्यास्तानंतर सुमारे २ तास २४ मिनिटे कालावधीत) लक्ष्मीपूजन करा. दाते पंचांगसह अन्य कॅलेंडरमध्ये २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे. त्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.'
वसुबारस, १७ ऑक्टोबर रोजी
यंदा वसुबारस शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी आलीय. या दिवशी महिला एकवेळ जेवण करून सायंकाळी सवत्स म्हणजे वासरासह गाईचे पूजन करतात. गोपूजनाने दिवाळीची सुरुवात होते.
धनत्रयोदशी, १८ ऑक्टोबर रोजी
यंदा धनत्रयोदशी शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी यमदीपदानही आहे. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी यम दीपदान केले जाते. सोने-नाणे स्वच्छ केले जाते.
नरकचतुर्दशी, २० ऑक्टोबर रोजी
यंदा नरकचतुर्दशी २० ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये, असा वर दिला.
लक्ष्मी-कुबेर पूजन, २१ ऑक्टोबर रोजी
यंदा लक्ष्मीपूजनाचे दोन मुहूर्त आहेत. मंगळवार २१ ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्यांसाठी अश्विन अमावस्या शुभ आहे. या दिवशी घर, दुकान सुशोभित केले जाते. सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन होते.
लक्ष्मीपूजनाचा २२ ऑक्टोबर रोजीही मुहूर्त
यंदा बुधवार २२ ऑक्टोबर रोजी सुद्धा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. या दिवशी दुपारी ३ ते ४.३० आणि रात्री १०.३० ते १२.०० पर्यंतचा मुहूर्त आहे. या विषयी सविस्तर माहिती दाते पंचांगातील पान नंबर ८६ वर दिलेली आहे.
बालिप्रतिपदा, २२ ऑक्टोबर रोजी
यंदा दिवाळी पाडवा २२ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी व्यापारी वर्षास सुरुवात असून वही, दुकान पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या दिवशी पत्नी पतीस ओवाळते.
यमद्वितीया, भाऊबीज, २३ ऑक्टोबर रोजी
यंदा यमद्वितीया आणि भाऊबीज गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करायचा, अशी पुराणात गोष्ट आहे. त्यामुळे या दिवशी बहिण भावाला जेवायला बोलावून त्याला ओवाळते.
