एपस्टीन फाईल्समधून जग हादरणार; भारताच्या राजकारणावरही परिणाम होणार?
- by Yogesh Bandagale
- December 16, 2025
- 214 views
पुणे : अमेरिकेतील बहुचर्चित एपस्टीन फाईल्स 19 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या संसदेत (US Congress) खुल्या होणार असून, त्यातून समोर येणारी माहिती ही जगभरातील राजकारण हादरवणारी ठरेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाचा परिणाम भारताच्या राजकारणावरही होऊ शकतो, इतकेच नव्हे तर देशाचा पंतप्रधान बदलण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
जेफ्री एपस्टीन नावाच्या व्यक्तीने जगभरातील प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचे गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात भारतातील काही व्यक्तींचाही उल्लेख असल्याची चर्चा असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. “एपस्टीन फाईल्समध्ये भारतातील काही आजी-माजी खासदारांची नावे असण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे त्यांनी सांगितले.
याआधीही देशातील पंतप्रधान बदलतील आणि नागपूरशी संबंधित व्यक्ती पंतप्रधानपदावर येईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. या भूमिकेवर ते अद्याप ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.
एपस्टीन प्रकरणावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “जेफ्री एपस्टीनने 1995 पासून अनेक राजकारणी व प्रभावशाली व्यक्तींना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलींच्या तक्रारीनंतर त्याला शिक्षा झाली होती. नंतर पुन्हा त्याला अटक करण्यात आली. मात्र, ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील उच्च सुरक्षा तुरुंगात त्याने आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती देण्यात आली. मात्र, त्या आत्महत्येवर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.”
“हाय सिक्युरिटी तुरुंगात असताना त्याला आत्महत्या करण्याची साधने कशी मिळाली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पोस्टमॉर्टमनंतरही काही तज्ज्ञांनी हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली,” असेही चव्हाण म्हणाले. आपण मांडत असलेली माहिती ही अमेरिकेच्या संसदेसंबंधित अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, एपस्टीन प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स आणि ब्रिटनचे युवराज प्रिन्स अँड्र्यू यांची नावे चर्चेत आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात संबंधित व्यक्तींनी वेगवेगळ्या पातळ्यांवर आरोप नाकारले आहेत किंवा कायदेशीर तोडगा काढल्याचेही त्यांनी नमूद केले.
एपस्टीन फाईल्स उघड झाल्यानंतर जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
