‘हिंद-दी-चादर’ उपक्रमातून सेवा परमो धर्माचा संदेश
- by Yogesh Bandagale
- February 13, 2026
- 16 views
चिपळूण : गुरु तेग बहादूर यांच्या शहीदी समागमानिमित्त ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत निःशुल्क वैद्यकीय सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुंच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाला कृतीतून अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय कामथे तसेच ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे या उपक्रमाअंतर्गत आरोग्य शिबिरे घेण्यात आली. उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे ९५ रुग्णांची तपासणी करण्यात आली, तर ग्रामीण रुग्णालय, गुहागर येथे १३० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण २२५ रुग्णांनी या मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला.
समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना, विशेषतः माता व बालकांना सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देणे हा या पंधरवड्याचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमांतर्गत लहान मुलांसाठी तसेच गर्भवती मातांसाठी आवश्यक लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. उपस्थित नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले.
यासोबतच विविध आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. ‘सेवा परमो धर्मः’ हा संदेश प्रत्यक्ष सेवा कार्यातून अधोरेखित करत गुरुंच्या बलिदानाची आठवण जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
