सन्मान नवदुर्गाचा उपक्रम चिपळूणमध्ये उत्साहात

चिपळूण (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी महिला काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने, नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी “सन्मान नवदुर्गाचा” हा उपक्रम चिपळूण शहरात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या उपक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शेखर निकम यांच्या सहकार्याने, तसेच माजी सभापती व महिला प्रदेश उपाध्यक्षा पूजाताई निकम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या उपक्रमाअंतर्गत समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला प्रशासकीय अधिकारी, उद्योजिका, पत्रकार, शेतकरी महिला, कष्टकरी महिला, कलाकार, क्रीडापटू, पोलिस अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आणि सामाजिक कार्यकर्त्या अशा विविध महिलांचा “सन्मान नवदुर्गाचा” म्हणून गौरव करण्यात आला.

या सन्मानप्राप्त महिलांमध्ये ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर, पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी, कष्टकरी महिला सुरेखा खंडजोडे, उद्योजिका रश्मी डेरे व सुधा खेडेकर, शेतकरी महिला समीक्षा कुंभार, पत्रकार स्वाती हडकर, महिला रिक्षाचालक वैशाली कामत चितळे, प्रशासकीय अधिकारी शशाली मोहिते, महिला कलावंत ऋचा भागवत, प्रबोधनकारक वृंदा फडके, संगीत क्षेत्रात प्राविण्य मिळवलेली श्रुती साप्ति आणि क्रीडा क्षेत्रातील अमन मुकादम यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या सांगतेला महिलांसाठी विशेष “गरबा नृत्य स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत १० उत्कृष्ट गरबा स्पर्धकांची निवड करण्यात आली व त्यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती जाधव, पोलीस उपनिरीक्षक मीरा महामुनी, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, वैद्यकीय अधिकारी कांचन मंदार, व अर्चना ठसाळे उपस्थित होत्या. या सर्व मान्यवर महिलांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये माजी सभापती व महिला प्रदेश उपाध्यक्षा पूजाताई निकम यांच्यासह, दिशा दाभोळकर (महिला प्रदेश सरचिटणीस), जागृतीताई शिंदे (महिला तालुकाध्यक्ष), आदिती देशपांडे (महिला शहराध्यक्ष), मनाली जाधव (महिला क्षेत्राध्यक्षा), रिंहाना बिजले (जिल्हा महिला कार्याध्यक्ष), रवीना गुजर (जिल्हा उपाध्यक्ष), शिवानी पवार, फिरोजा मोडक, नीता साडविलकर, वर्षा जागुस्टे (माजी नगरसेविका), तसेच पुनम भोजने, संपदा खेडेकर, शमिना परकार, तसलीम राजीवटे, नसरीन खडस, ममता ठसाळे, दर्शना भाटवडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यात आला. सामाजिक जाणीवेने राबवलेला “सन्मान नवदुर्गांचा” उपक्रम स्तुत्य व प्रेरणादायी ठरला.
 

 

संबंधित लेख