वाशिष्ठी कृषी महोत्सवात कॅट शो व डॉग शोचे आकर्षण

७ व ८ जानेवारीला स्पर्धा; विजेत्यांना आकर्षक बक्षिसे

चिपळूण (प्रतिनिधी): वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शन – कृषी महोत्सव २०२६ मध्ये यंदाही प्राणीमित्र आणि पाळीव प्राण्यांसाठी खास आकर्षण ठरणाऱ्या कॅट शो आणि डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारी रोजी कॅट शो, तर ८ जानेवारी रोजी डॉग शो सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार असून, या स्पर्धांमुळे कृषी महोत्सवाला वेगळीच रंगत येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या प्राणीमालकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.

नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेला हा कृषी महोत्सव ५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत बहादूरशेख नाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदान, चिपळूण येथे होणार आहे. शेती, पशुधन, आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नागरिक, युवक आणि लहानग्यांसाठी हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

गतवर्षी प्रथमच कॅट शो व डॉग शोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला प्राणीमित्रांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने यंदाही पाळीव प्राण्यांचा जल्लोष पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, इच्छुकांनी दि. २ जानेवारीपर्यंत ९४२२६६११९७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्राण्यांचे वय किमान अडीच महिने असणे आवश्यक असून, त्यांची सुरक्षितता व देखभाल ही संबंधित मालकांची जबाबदारी राहणार आहे.

विविध स्पर्धा, प्रदर्शने, खाद्यपदार्थांची रेलचेल, तंत्रज्ञानाची माहिती आणि मनोरंजन यांचा संगम असलेला वाशिष्ठी कृषी महोत्सव २०२६ हा शेतकरी, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्ञान व आनंदाची पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

मोफत रेबीज लसीकरण

दरम्यान, वाशिष्ठी कृषी महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय विभागाच्या वतीने श्वान व मांजरींसाठी मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ पशुपालकांनी घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय सोनवणे यांनी केले आहे.

संबंधित लेख