खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सरासरी ६० टक्के मतदान

खेड : खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (दि. ७) शांततेत मतदान पार पडले. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २० तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. अशा एकूण ७३ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून तालुक्यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

तालुक्यातील निगडे, लवेल, जामगे यासह काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदानाच्या गतीवर परिणाम झाला. त्यामुळे काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी घसरली असून मतदारांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. धामणी येथील एका मतदान केंद्रावर किरकोळ बाचाबाचीची घटना घडल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले.

मतदान यंत्रांमध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत थांबलेल्या मतदारांना मतदानाची संधी मिळावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाची वेळ वाढवून दिली. सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत २५.४० टक्के मतदान झाले, तर दुपारी १.३० पर्यंत ४० टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४८.२८ टक्के मतदान झाले असून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी ६० टक्क्यांवर पोहोचली. तालुक्यातील एकूण १,३८,९२४ मतदारांपैकी ६७,०७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यंदाच्या निवडणुकीत खेड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. जिल्हा परिषदेत थेट लढती तर पंचायत समितीच्या गणांमध्ये तिरंगी व चौरंगी लढती रंगल्या. या लढती शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झाल्या. युतीतील पक्षांनी स्वतंत्रपणे, तर आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविल्याचे चित्र दिसून आले.

खेड तालुक्यातील २०१ मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. मात्र मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे काही ठिकाणी वातावरण तापले होते. कामावर जायचे असल्याने काही मतदार मतदान न करताच निघून गेल्याचेही चित्र पाहायला मिळाले.

शिवसेना नेते रामदासभाई कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक जामगे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. भरणे नवभारत येथील मतदान केंद्रावर महिला मतदारांसाठी तसेच लहान मुलांसाठी खेळण्यांची व्यवस्था आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय निवडणूक आयोगामार्फत करण्यात आली होती. या केंद्रास ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले होते.

मतदान केंद्रांवर पोलीस निरीक्षक विवेक अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान यंत्रे सुमारे ३१ एसटी बसेसद्वारे पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत खेड तालुका क्रीडा संकुलात आणण्यात आली. सोमवारी (दि. ९ फेब्रुवारी) सकाळी याच ठिकाणी मतमोजणी होणार असून तोपर्यंत मतदान यंत्रे कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महत्त्वाच्या असून गावाच्या विकासासाठी हा पाया मजबूत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले.

संबंधित लेख